Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 10:50 AM (IST)
Tags: mn3
दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची थकबाकी देणार
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : महागाई भत्त्याची 14 महिन्यांची थकबाकी गणेशोत्सवापूर्वी तर सात महिन्यांची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्यात येईल. जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने गुरुवारी दुपारी आपला संप मागे घेतला.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त जागांची त्वरित भरती करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मंगळवारपासून तीन दिवसांचा संप केला होता. तृतीय आणि चतुर्थश्रेणी वर्गातले कर्मचारी या संपात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने त्याचा मोठा परिणाम सरकारी कामकाजावर झाला होता. दोन दिवस हा संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेच्यावतीने करण्यात आला होता. या संपाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना आज पुन्हा चर्चेसाठी बोलावले होते.
शासकीय कर्मचार्‍यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन मुख्य सचिवांनी या बैठकीत दिले. महागाई भत्त्याची 14 महिन्यांची थकबाकी गणेशोत्सवापूर्वी आणि दिवाळीमध्ये सात महिन्यांची थकबाकी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. बक्षी समितीचा अहवाल ताबडतोब मागवून घेणार आहे. हा अहवाल आल्याबरोबर जानेवारी 2019 पासून वेतन नितीसह सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, सरचिटणीस अविनाश दौंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात 1.25 लाख चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. त्यांच्या संदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक पुढच्या आठवड्यात घेणार आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे बरेच प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांचीही लवकरच बैठक घेण्याचे मान्य केले आहे. अंशदायी पेन्शनबाबत पुनर्विचार करण्याबाबत सरकार सकारात्मक नव्हते; पण या संपाच्या   पार्श्‍वभूमीवर त्याच्यासाठी स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. या सर्व बाबींवर आम्ही समाधानी असून मराठा आरक्षणासाठी असलेला बंद आणि रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून दुपारी 12.30 वाजता संप मागे घेतल्याचे सरदेशमुख व दौंड यांनी जाहीर केले. मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती
संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिक्षक समिती, शिक्षक भारती, टीडीएफ, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे
पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: