Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आशियाई स्पर्धा : सौरभ चौधरीचा सुवर्ण‘नेम’
ऐक्य समूह
Wednesday, August 22, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: sp1
भारतीय महिला हॉकी संघाचा गोलांचा पाऊस
5जाकार्ता, दि. 21 (वृत्तसंस्था) :  इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा तिसरा दिवस भारतीय नेमबाजांनी गाजवला. उत्तर प्रदेशातील मेरठच्या 16 वषीर्य सौरभ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले तर अभिषेक वर्माने कांस्यपदक पटकावले. रायफल थ्री पोझिशन प्रकारात संजीव राजपूतने रौप्यपदक मिळवले. चौधरीच्या थक्क करणार्‍या कामगिरीवर महिला हॉकी संघाने कळस चढवला. कझाकस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांनी तब्बल 21 गोलांचा पाऊस पाडताना प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही.
10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ आणि अभिषेक यांनी अंतिम आठ जणांमध्ये स्थान मिळवल्याने भारताच्या पदकाच्या आशा जिवंत राहिल्या होत्या. अंतिम तीन स्पर्धकांमध्ये सौरभ दुसर्‍या स्थानी होता. मोक्याच्या क्षणी त्याने जपानी स्पर्धकावर निर्णायक आघाडी मिळवली. अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम फेरीत अखेरच्या शॉटमध्ये सौरभने सुवर्णवेध घेतला. सौरभने 240.7 गुणांसह सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. सुवर्णपदकाला गवसणी घालणारा तो सर्वात लहान भारतीय नेमबाज ठरला आहे. सौरभ चौधरीला उत्तर प्रदेश सरकारकडून 50 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या प्रकारात अभिषेक वर्माने 219.3 गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावले. त्या आधी 37 वर्षीय अनुभवी नेमबाज संजीव राजपूतने 50 मीटर थ्री पोझिशन  प्रकारात 452.7 गुणांसह रौप्यपदक मिळवले. यंदाच्या स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांचे हे सहावे पदक आहे.
कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्य
दरम्यान, भारताची कुस्तीपटू दिव्या काकरान हिने 68 किलो वजनी गटात फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक पटकावले. तिने चीनची कुस्तीपटू चेन वेनलिंगचा 10-0 ने पराभव केला. दिव्याला उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या शारखू तुमेंतसेत्सेगकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर शारखूने अंतिम फेरी गाठल्याने दिव्याला रेपेचेज लढतीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत तिने पदकाची कमाई केली. मात्र, 76 किलो वजनी गटात भारताची किरण कझाकिस्तानच्या खेळाडूकडून 4-2 ने पराभूत झाली.
दरम्यान, जलतरणात 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वीरधवलचे कांस्यपदक अवघ्या 0.01 सेकंदाने (म्हणजे सेकंदाचा शंभरावा भाग) हुकले. वीरधवलने 22.47 सेकंदांची वेळ नोंदवली. कांस्यपदक जिंकणार्‍या जपानच्या सुनिची नाकाओने 22.46 सेकंदांची वेळ नोंदवली. जिम्नॅस्टिक्समध्येही भारताच्या पदरी निराशा आली. रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणारी दीपा कर्माकर व्हॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीतून बाहेर पडल्याने पदकाच्या आशेवर पाणी फिरले. कबड्डीमध्ये दक्षिण कोरियाकडून झालेल्या पराभवाचा धक्का पचवत भारतीय पुरुष संघाने दमदार पुनरागमन केले. त्यांनी थायलंडवर 49-30 ने मात केली तर रोईंगमध्ये महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने सिंगल स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतीय महिला हॉकी संघानेही आज कमाल केली. त्यांनी कझाकस्तानवर तब्बल 21-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला. भारतीय महिलांनी काल यजमान इंडोनेशियाचा 8-0 ने पराभव केला होता. त्या कामगिरीवर आज कडी केली. भारतीय पुरुषांनी काल इंडोनेशियावर 17 गोल चढवले होते. तो विक्रम भारतीय महिला हॉकी संघाने आज मागे टाकला. भारताकडून नवनीत कौरने सर्वाधिक पाच, गुरमित कौरने चार, लालरेमसियामी व वंदना यांनी प्रत्येकी तीन तर लिलिमाने दोन गोल केले. त्याशिवाय नेहा, उदिता, दीप ग्रेस, नवज्योत कौर व मोनिका यांनी प्रत्येकी एक गोल केला. वुशू क्रीडा प्रकारातही भारताची चार पदके निश्‍चित झाली आहेत. नरेंद्र ग्रेवाल, सूर्यभानू प्रताप सिंग, संतोषकुमार व रोशिबिनादेवी नाओरेम यांनी किमान चार कांस्यपदके निश्‍चित केली आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: