Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

नीरज चोप्राचे भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्ण
ऐक्य समूह
Tuesday, August 28, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: sp1
तिघांचे रूपेरी यश; सिंधू सोनेरी यशाच्या जवळ
5जाकार्ता, दि. 27 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नवव्या दिवशी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. 20 वर्षीय नीरजने 88.06 मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
दरम्यान, भारतीय क्रीडापटूंनी ‘ट्रॅक अँड फिल्ड’मध्ये यशोमालिका पुढे सुरूच ठेवली. धावपटू धारून अय्यासामी, सुधासिंग आणि लांब उडीत नीना वरकिल यांनी रौप्यपदकांची कमाई केली तर बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, ‘फुलराणी’ सायना नेहवालला उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अर्थात भारताला बॅडमिंटनमध्ये तब्बल 36 वर्षांनी एकेरीचे पदक मिळाले आहे.
हरयाणातील पानिपत येथे जन्मलेल्या नीरज चोप्राला यंदा आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचा ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला होता. त्याने सोनेरी कामगिरी करत राष्ट्रध्वजाची शान आणखी वाढवली आहे. नीरजने तिसर्‍या प्रयत्नात 88.06 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला.     अंतिम फेरीत हीच त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. त्याने चीन आणि पाकिस्तानच्या भालाफेकपटूंना लीलया मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. चीनच्या लिऊ किजेनने 82.22 मीटर भालाफेक करून रौप्य तर पाकच्या अर्शद नदीमने 80.75 मीटर फेक करून कांस्यपदक मिळवले. अंतिम फेरीत नीरजची जणू स्वत:शीच स्पर्धा होती. त्याने पहिल्याच प्रयत्नात 83.46 मीटर भाला फेकला. तिसर्‍या प्रयत्नात त्याने 88.06 मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रम मोडला. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे हे आठवे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नीरजने राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही सुवर्णपदक पटकावले होते. जागतिक युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक पटकावल्याने नीरज प्रकाशझोतात आला होता. तेव्हापासून त्याची कामगिरी सुधारतच आहे.
दरम्यान, आज दिवसभरात भारताला एकूण पाच पदके मिळाली.  त्यात ङ्गट्रॅक अँड फिल्डफमध्ये भारताच्या क्रीडापटूंनी रूपेरी कामगिरी बजावली. तमिळनाडूचा 21 वर्षीय धावपटू अय्यासामी धारून याने पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 48.96 सेकंद वेळ नोंदवत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अनुभवी धावपटू सुधासिंग हिनेही तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत 9:40:03 अशी वेळ नोंदवत रौप्यपदकाला गवसणी घातली. तिने या आधी 2010 मध्ये ग्वांगझू येथे आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. महिलांच्या लांब उडीतही नीरा वरकिल हिने रौप्यपदक पटकावले. तिने चौथ्या प्रयत्नात 6.51 मीटर लांब उडी मारली. याच कामगिरीच्या बळावर तिने पदक मिळवले.
सिंधू, सायनाने रचला इतिहास
आशियाई स्पर्धांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि ङ्गफुलराणीफ सायना नेहवाल यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. एशियाडमध्ये बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे तर कांस्यपदक मिळवणार्‍या सायनानेही बॅडमिंटन एकेरीत 36 वर्षांनी भारतासाठी पदक जिंकले. यापूर्वी 1982 मध्ये सय्यद मोदीला पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळाले होते. सायनाला उपांत्य फेरीत चीनी तैपेईच्या ताइ जू यिंगने 21-17, 21-14 असे नमवून अंतिम फेरी गाठली. या पराभवानंतरही सायनाने कांस्यपदक मिळवले. दुसर्‍या उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा 21-17, 15,21, 21-10 असा चुरशीच्या झुंजीत पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये भारताचे आणखी किमान रौप्यपदक निश्‍चित झाले आहे. मात्र, सिंधूकडून देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: