Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

स्वप्ना आणि अरपिंदरची सुवर्णझेप
ऐक्य समूह
Thursday, August 30, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: sp1
एशियाडमध्ये डबल धमाका
5जाकार्ता, दि. 29 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या राजधानीत सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 11 व्या दिवशी स्वप्ना बर्मन व अरपिंदरसिंग यांनी ‘ट्रॅक अँड फिल्ड’मध्ये भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. अरपिंदरसिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताला 48 वर्षांनी पहिले सुवर्णपदक मिळवून दिले तर महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात स्वप्ना बर्मनने आशियाई स्पर्धांच्या इतिहासात भारताचे पहिले सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताचे हे 11 वे सुवर्णपदक आहे.
पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी असलेल्या अरपिंदरने आपल्या तिसर्‍या प्रयत्नात 16.77 मीटरवर मारलेल्या उडीच्या बळावर सुवर्ण पटकावले. उझबेकिस्तानच्या रसलान कुरबानोव्ह (16.62 मीटर) रौप्य तर चीनच्या शुओ काओने (16.56 मीटर) कांस्यपदक मिळवले.  भारताने आशियाई स्पर्धांमध्ये तिहेरी उडीत 48 वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी महिंदरसिंगने 1970 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अरपिंदरची पहिली उडी अयशस्वी ठरली. त्याने दुसर्‍या उडीत 16.58 मीटरचे अंतर कापले. त्याची तिसरी उडी मात्र 16.77 मीटरची होती. अरपिंदरची चौथी उडी 16.08 मीटरची होती. त्याची पाचवी आणि सहावी उडी अयशस्वी ठरली. त्यामुळे तिसर्‍या प्रयत्नातील उडीने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात स्वप्ना बर्मन हिने 6 हजार 26 गुणांची कमाई करून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. स्वप्नाने भालाफेकीत अव्वल कामगिरी केल्यानंतर 800 मीटर शर्यतही जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
दुती चांदचे दुसरे रौप्यपदक
दरम्यान, धावपटू दुती चांदने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. तिचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे रौप्यपदक आहे. दुतीने 23.20 सेकंदात 200 मीटरची शर्यत पूर्ण केली. दुतीने पदक मिळवण्यापूर्वी मणिका बत्रा आणि शरत कमल या जोडीने टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवले. दरम्यान, महिला हॉकीत भारताने चीनचा 1-0 ने पराभव करून 1998 नंतर प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. आता सुवर्णपदकासाठी भारतीय महिलांची झुंज उद्या जपानशी होणार आहे. बॉक्सिंगमध्ये 75 किलो वजनी गटात भारताच्या विकास कृष्णनने उपांत्य फेरी गाठून आणखी पदक निश्‍चित केले तर लाइट फ्लायवेट (49 किलो) गटातही अमितने उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्‍चित केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: