Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिस्तीबाबत बोलायला गेल्यास लोक ‘हुकूमशहा’ म्हणतात : नरेंद्र मोदी
ऐक्य समूह
Monday, September 03, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : व्यवस्थेमध्ये शिस्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, शिस्त पाळण्याबाबत बोलायला गेल्यास आजकाल लोक ‘हुकूमशहा’ म्हणून कलंकित करतात, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करून विरोधकांवर हल्लाबोल केला.
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापतिपदाची वर्षपूर्ती झाली आहे. या काळातील आपल्या अनुभवांचे त्यांनी सचित्र संकलन करुन एक ‘कॉफी टेबल बुक’ तयार केले आहे. त्याचे रविवारी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर मोदी म्हणाले, वेंकय्याजी शिस्तीच्या बाबतीत खूपच आग्रही आहेत. मात्र, आपल्या देशातील स्थिती सध्या अशी झाली आहे, की शिस्तीला लोकशाहीविरोधी ठरवले जात आहे. शिस्तीचा कोणी जरा देखील आग्रह केला की लोक त्याला हुकूमशहा म्हणून संबोधत आहेत.
उपस्थितांसमोर आपले विचार मांडताना मोदींनी नायडूंच्या शिस्तप्रिय कार्यशैलीचा उल्लेख केला. ध्येयपूर्तीसाठी नियमबद्ध कार्यप्रणाली अनिवार्य आहे. व्यवस्था आणि व्यक्ती या दोघांसाठी हा गुण लाभदायक ठरतो, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, मोदींनी नायडूंना स्वभावाने शेतकरी असे संबोधले. ते म्हणाले, नायडूंच्या डोक्यात कायमच आपल्या देशातील गाव, शेतकरी आणि कृषीसंबंधी गोष्टी घोळत असतात. याचे चांगले उदाहरण सांगायचे झाल्यास नायडू यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये स्वत:ला ग्रामीण विकास मंत्रालय देण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे खाते मिळाल्यानंतर गावांना शहरांशी जोडणार्‍या प्रधानमंत्री  ग्राम सडक योजना त्यांनी तयार केली. त्यामुळे या योजनेचे श्रेय वेंकय्या नायडू यांनाच जाते. मनमोहन सिंग म्हणाले, उपराष्ट्रपती नायडू यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभावाची झलक त्यांच्या एका वर्षाच्या कामातून दिसून येते. लोक शेती व्यवसायातून दुसरीकडे वळताहेत हा देशासमोरील एक गंभीर प्रश्‍न बनला आहे. यासंदर्भात बोलताना नायडू म्हणाले, सध्याच्या काळात सरकारकडून कृषीक्षेत्राकडे पक्षपातीपणे पाहिले जात आहे. कृषीक्षेत्राला टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इकडे अर्थमंत्रीही उपस्थित आहेत. कदाचित मी जे काय बोलतोय हे त्यांना आवडणार नाही. मात्र, त्यांनी सर्वच क्षेत्रांची काळजी घ्यायला हवी. शेतीकडे पक्षपातीपणे पाहू नये अन्यथा यात फायदा नसल्याने लोक शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष करतील.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: