Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आ. राम कदमांचा माफीनामा, तरी कारवाईच्या मागणीवर विरोधक ठाम
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 10:44 AM (IST)
Tags: mn3
शिवसेनाही आक्रमक; अभाविपचीही निदर्शने
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यासाठी मदत करेन, या वादग्रस्त विधानावर राज्यभरात उमटलेल्या संतप्त पडसादानंतर अखेर भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी आज महिलांची बिनशर्त माफी मागितली. मात्र, त्यांची माफी पुरेशी नाही, असे सांगत शिवसेनेसह विरोधी पक्षांनी राम कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आज कदमांविरुद्ध निदर्शने केली.
आ. राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात तरुणांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केले होते. राज्यभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजप व राज्य महिला आयोगाला याची दखल घ्यावी लागली आहे. राज्य महिला आयोगाने कदम यांना नोटीस देऊन सात दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही कदम यांच्या वक्तव्याची चित्रफित मागवली आहे.
त्यामुळे आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही, आपल्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचा दावा कालपर्यंत करणार्‍या राम कदम यांनी आज ट्विट करून राज्यातील माता-भगिनींची माफी मागितली आहे. राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मने दुखावली. झाल्या प्रकाराबद्दल मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. 
पुनःश्‍च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदारकी रद्द करा
राम कदम यांनी माफी मागितली असली तरी तेवढ्याने भागणार नाही. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. जो न्याय प्रशांत परिचारक यांना लावला तोच न्याय राम कदम यांना लावायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. जनमताच्या रेट्यामुळे राम कदम यांनी नाइलाजाने माफी मागितली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी राम कदम यांच्यावर गुन्हा नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. पक्षाच्या महिला कार्यकर्त्या कालपासून घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आहेत. कदमांच्या वक्तव्याची चित्रफितही पोलिसांना देण्यात आली तरीही गुन्हा नोंदवला गेला नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राम कदम यांना परिचारक यांच्याप्रमाणे निलंबित करण्याची मागणी लावून धरली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना, अभाविपचे आंदोलन
बेताल वक्तव्य करणार्‍या राम कदम यांच्याविरुद्ध विरोधकांनी रान उठवलेले असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही आज आंदोलन करून कारवाईची मागणी केली. एवढेच नव्हे तर संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आज राम कदमांच्या फोटोला काळे फासून आंदोलन केले गेले. राम कदम यांनी आक्षेपार्ह विधान केले असून स्त्रीला माता मानणार्‍या भारतीय संस्कृतीचा आणि सणांचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील वाचाळवीरांवर लवकरात लवकर कारवाई करावी. राज्य महिला आयोगानेदेखील बोटचेपी भूमिका न घेता लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपच्या मुंबई महानगर सहमंत्री स्वाती चौधरी यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: