Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाचशे बसेस खरेदीसाठी एसटीला निधी देणार
ऐक्य समूह
Friday, September 07, 2018 AT 10:49 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : वाढत्या तोट्यामुळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या एस.टी. महामंडळाला मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वसामान्यांचे वाहन असलेल्या एस.टी. महामंडळाला 500 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात एस.टी. महामंडळाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत बस खरेदीसाठी लागणार्‍या निधीपैकी 12.5 कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिले. एस.टी. बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एस.टी. बसेसमधून प्रवास करता यावा यासाठी आवश्यक मदत करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, देवळी, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गुस, भद्रावती, राजुरा, चिमूर या बसस्थानकांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.   
त्यापैकी चंद्रपूर, मूल, बल्लारपूर बसस्थानकांच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात यावी. ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाची कामे वेळेत आणि दर्जात्मक पद्धतीने करून घेण्यात यावीत, अशा सूचनाही अर्थमंत्र्यांनी दिल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: