Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर पाटील धावले राम कदमांच्या मदतीला
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
म्हणतात, माफी मागितली, विषय संपला
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या आणि पक्षाच्या तमाम नेत्यांनी हात झटकल्याने एकाकी पडलेल्या आ. राम कदम यांच्या मदतीला अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. भाजप प्रवक्ते असलेल्या राम कदम यांना ‘क्लीन चिट’ देताना त्यांनी माफी मागितल्याने हा विषय आता संपायला हवा, असे सांगत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली. प्रसारमाध्यमांनी एखाद्या वक्तव्यावर टीका करताना त्यामागील हेतू लक्षात घेतला पाहिजे, असा सल्ला देताना या वादाचे खापर त्यांनी प्रसारमाध्यमांवर फोडले. दरम्यान, बेताल वक्तव्यांबद्दल राम कदम यांच्या विरुद्ध घाटकोपर व बार्शी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडी उत्सवात तरुणांशी संवाद साधताना राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने नकार दिला तर माझ्याकडे या, तिला पळवून आणून तुमच्याकडे देतो, असे वक्तव्य राम कदम यांनी केल्यावर त्याची राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत मौन बाळगणे पसंत केले होते. त्यातच संघ परिवारातील विद्यार्थी संघटनेने म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक भूमिका घेऊन काल कदम यांच्या घरासमोर निदर्शनं करून कारवाईची मागणी केली. त्यामुळे राम कदम एकाकी पडले होते; परंतु आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या मदतीला धावून आले. राम कदम यांची पार्श्‍वभूमी महिलांना मदत करणारी आहे. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. 
एखादं वाक्य चुकून गेलं तर त्यामागील हेतू व अर्थ लक्षात घेतला पाहिजे. चुकीचा अर्थ निघत असेल तरी त्यांनी आता जाहीर माफी मागितली आहे. माफी मागितल्यावर हा विषय संपवायला हवा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
लोकप्रतिनिधींनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. मात्र, एखाद्या वाक्याचा अर्थ काय होतो, हे दाखवताना प्रसारमाध्यमांनीही विचार केला पाहिजे. त्यांना काय म्हणायचं होते? त्याचा काय अर्थ होता, हे माध्यमांनीही बघितले पाहिजे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी या वादाबद्दल माध्यमांनाच अप्रत्यक्षपणे दोषी धरले. पक्ष राम कदम यांच्यावर कारवाई करणार की नाही, असे विचारल्यावर मात्र सावध पवित्र घेतला. कारवाईबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील, असे सांगत त्यांनी हात झटकले.
विरोधक कारवाईच्या मागणीवर ठाम
चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांची पाठराखण
केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हा विषय भाजपसाठी संपला असेल. मात्र, आमच्यासाठी हा विषय संपलेला नाही. आम्ही
याविषयी जाब विचारणारच. भाजपने लोकप्रतिनिधींनी कसं वागायल हवं, हे शिकवावं. भाजपने राम कदमांवर अजूनही कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, राम कदम यांच्याविरुद्ध मुंबईतील घाटकोपर व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
आ बैल मुझे मार!
बेताल वक्तव्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या राम कदम यांनी आज पुन्हा अकारण टीका ओढवून घेतली. चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे निधन झाल्याच्या अफवेवर विसंबून राम कदम यांनी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण करून टाकली. ट्विटरवरून शोकसंदेश प्रसिद्ध केल्यावर हा घोटाळा लक्षात आला आणि नंतर राम कदम यांनी ते ट्विट मागे घेतले. नंतर अमेरिकेत उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रे यांनी आपला फोटो पोस्ट करून या अफवेवर पडदा टाकला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: