Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण येथे दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, 4 गंभीर जखमी
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि 7 : पाटण-कोयना मार्गावर येराड गावच्या हद्दीत शुक्रवार, दि. 7 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कराड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत पाटण पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, कोयना विभागातील कराटे येथील किरण कृष्णात सूर्यवंशी हे आपले दोन भाचे किरण रमेश चव्हाण (वय 13) आणि महेश रमेश चव्हाण (वय 15, दोघे रा. पाटण) यांना दुचाकी गाडीवरून (क्र. एम.एच. 08 यु. 8768) ट्रिपल सीट कराटे गावाकडे निघाले होते तर सागर नाना घाडगे (वय 35, रा. उंब्रज) आणि मोहन साहेबराव भिसे (वय 40, रा. अंबापूर निगडे) हे दोघे दुचाकीवरून कोयनानगरहून उंब्रज बाजूला निघाले होते. या दोन्ही दुचाकींची येराड गावच्या हद्दीत समोरासमोर धडक झाली. त्यात दोन्ही गाडीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. यात पाटण (रामपूर) येथील महेश रमेश चव्हाण (15) याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला तर किरण कृष्णात सूर्यवंशी, किरण रमेश चव्हाण, सागर नाना घाडगे, मोहन साहेबराव भिसे हे 4 जण गंभीर जखमी झाले असून  त्यांच्यावर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद उशिरा पाटण पोलिसात करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पाटण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर महेशचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सपोनि. यु. एस. भापकर तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: