Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा पोलिसांचा कारवायांचा धडाका
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn1
दत्ता जाधवच्या टोळीतील आणखी एकास अटक : दोन पिस्तुले जप्त
5सातारा, दि. 7 : येथील पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दत्ता जाधवच्या टोळीतील जत, जि. सांगली येथील मोक्काच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेल्या संशयित आरोपी सूरज उर्फ पप्पू घुले (वय 29, रा. गोडोली) याच्यासह आणखी दोघांना अटक केली. या दोन्ही संशयितांकडून दोन गावठी पिस्तुल व कार असा एकूण 6 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पुसेगाव येथील दुकानादारालाही अटक करण्यात आली असल्याची माहिती  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची सूरज उर्फ पप्पू भीमराव घुले (वय 29), नितीन भीमराव खरात (वय 26, रा. पुसेगाव) व वीरधवल किरण देशमुख (वय 25, रा. खटाव) अशी नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव येथे काही संशयितांकडे बंदूक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुसेगाव येथे सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ कारमधून फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक बंदूक सापडली. पोलिसांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने ती बंदूक पप्पू घुले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तसेच त्याने आणखी एक पिस्टल खटाव येथील हार्डवेअरचा दुकानदार वीरधवल देशमुख याला विकले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यानुसार वीरधवल याला ताब्यात घेवून अटक केली. एका संशयिताकडून माहिती मिळेल त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाईला  सुरुवात केल्यानंतर पप्पू घुले याला ताब्यात घेण्यात आले. तो जत येथील पोलीस हल्ल्यात पाहिजे असलेला तसेच मोक्कामधील पाहिजे असलेला संशयित आरोपी असल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. यामध्ये पप्पू घुलेवर बारामती, सातारा शहर व जत  पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न व मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही सर्व लिंक एकच असल्याने व त्यांच्याकडे शस्त्रे सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली व न्यायालयात हजर केेले असता तिघांना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: