Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कळंबी लूटमार प्रकरणातील संशयित विटा येथून जेरबंद
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5वडूज, दि. 7 : कळंबीनजीक सोन्याचे दागिने लुटणार्‍या तीन युवकांना अटक करण्यात औंध पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे अकरा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अवघ्या नऊ ते दहा तासात औंध पोलीस, सातारा एलसीबी पथक तसेच विटा पोलिसांनी नाकाबंदी करून तीनही संशयितांना विटा येथे पकडले. दरम्यान, या लूटमार प्रकरणामुळे औंध, पुसेसावळी परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, मलकापूर, कराड येथील सोन्याचे दागिने विकणारे व्यापारी अशोककुमार प्रतापचंद लोहार यांना आम्हाला पुसेसावळी येथे शोरूम काढावयाचे आहे. तुम्ही गुरुवारी दागिने घेऊन पुसेसावळी येथे या असे सांगितले. त्यानंतर अशोककुमार लोहार हे पुसेसावळी येथे आले असता  त्यांना एकाने दुचाकीवर बसवून कळंबी ते औंध रस्त्यावर असणार्‍या कॅनॉलजवळ आणले. त्यापूर्वीच तेथे दबा धरून बसलेल्या दोन जणांनी अशोककुमार लोहार यांच्या डोळयात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील सोने असलेली बॅग हिसकावून पलायन केले. अशोककुमार यांनी ही माहिती औंध पोलिसांना दिल्यानंतर औंधचे सपोनि. सुनील जाधव यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर दुपारी दोननंतर औंध पोलिसांसह सातारा एलसीबी पथकाने लूटमार करणार्‍या चोरट्यांचा शोध सुरू केला. पुसेसावळी येथील सीसी टीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तपासून तसेच सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणी नाकाबंदी करून संशयितांना अवघ्या दहा तासात विटा येथे जेरबंद केले. यामध्ये श्रीकांत माळाप्पा केंगार (वय 19), सोमनाथ जालिंदर आवळे (वय 23), सोनल तुकाराम लोटके (वय 22), सर्व रा.विटा, जि.सांगली यांना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 69 हजार 120 रुपयांच्या 34 सोन्याच्या लहान अंगठ्या, 2 लाख 38 हजार 32 रुपयांचे कानातील 42 टॉप्स, 4 लाख 46 हजार 850 रुपयांचे कानातील सोन्याचे खडे असलेले 121 जोड, 1 लाख 66 हजार रुपयांचे सोन्याचे खडे असलेले कुडकी प्रकारचे 51 जोड, असा एकूण 11 लाख 20
हजार 2 रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला आहे. हे सर्व दागिने सुमारे चाळीस तोळे आहेत. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, सपोनि. सुनील जाधव, सातारा एलसीबीचे सपोनि. विकास जाधव, विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पिसाळ, पोलीस उपनिरीक्षक
श्रीकांत देव, हवालदार प्रशांत पाटील, दादा देवकुळे, शिवाजी खाडे यांनी परिश्रम घेतले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: