Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जळगावमध्ये एटीएसची दुसर्‍या दिवशीही कारवाई
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: mn3
साकळी गावातून आणखी एक जण ताब्यात
5जळगाव, दि. 7 (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील साकळी येथून गुरुवारी एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारीही विजय उर्फ भैया उखर्डू लोधी (वय 34) या तरुणास ताब्यात घेतले. एटीएसचे पथक दुपारी चार वाजता गावात दाखल झाले. त्यांनी साकळीतील दुसर्‍या तरुणास ताब्यात घेतल्याने गाव आणि यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.
एटीएसच्या पथकाने गुरुवारी दुपारी साकळी (जि. जळगाव) येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय 28) याला ताब्यात घेतले होते. त्याचा गॅरेजचा व्यवसाय असून तो मूळचा मुक्ताईनगरमधील कर्की गावचा रहिवासी असून सध्या साकळीत मामाच्या घरात राहत होता. एटीएसने तब्बल अडीच तास सूर्यवंशीच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केल्याचे समजते. सूर्यवंशीला ताब्यात घेऊन एटीएसचे पथक मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सूर्यवंशी हा एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याते समजते. या कारवाईबाबत एटीएसने कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही.
या कारवाईची चर्चा गावात सुरू असताना शुक्रवारी दुपारी 4 वाजता एटीएसचे पथक गावात दाखल झाले. हे पथक गावातील लोधी वाड्यात राहणार्‍या विजय उर्फ भैया उखर्डू लोधी याच्या घरी गेले. तुमच्या मुलाची खाजगीत विचारपूस करायची आहे, असे सांगत पथकाने त्याच्या कुटुंबीयास घराबाहेर काढले. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून एटीएसच्या अधिकार्‍यांनी लोधीची एक तास विचारपूस केली आणि घराची झडतीही घेतली. त्यानंतर एटीएसने त्याला ताब्यात घेतले. त्याला घेऊन हे पथक मुंबईला रवाना झाले. या कारवाईमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. एटीएसची दोन पथके गावात तळ ठोकून आहेत. गुरुवारी ताब्यात घेण्यात आलेल्या सूर्यवंशीच्या घराची एका पथकाने आज पुन्हा झडती घेतली. गावातील काही भागात या पथकांकडून गुप्तपणे तपासणी सुरू आहे.    
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी एटीएसने ही कारवाई केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: