Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामावर आल्याने तणाव
ऐक्य समूह
Monday, September 10, 2018 AT 11:43 AM (IST)
Tags: lo1
पोलिसांची जोरदार धावपळ
5सातारा, दि. 9 : गेल्या काही दिवसात विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर आणि खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांच्यामधून विस्तवही जात नाही. दोघेही एकमेकांवर टीका करण्यात मागेपुढे पहात नाहीत. दीड महिन्यापूर्वी शासकीय विश्रामधामावर दोन्ही राजे एकाचवेळी आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन अनुचित प्रकार घडू दिला नव्हता. त्यानंतर गेला दीड महिना दोघे एकमेकांवर शरसंधान करत आहेत. त्यामुळे दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामावर येणार असतील तर मोठा फौजफाटा  तेथे तैनात केला जातो. रविवारी मात्र अनपेक्षितपणे दोन्ही राजे शासकीय विश्रामधामावर आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माणझाले होते. दोन्ही राजे शासकीय विश्रामधामावर येणार असल्याची बातमी पोलिसांना समजताच पोलिसही तेथे दाखल झाले. मात्र अचानक बातमी कळाल्याने पोलिसांची जोरदार धावपळ झाली. 
 सावज टप्प्यात आल्यानंतर मी बाण मारणार आणि खा.उदयनराजे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशा प्रकारची वक्तव्ये करुन ना. रामराजे यांनी खळबळ उडवून दिली होती. या वक्तव्यानंतर नुकतेच खा.उदयनराजे यांनी फलटण येथे जावून ना. रामराजे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे दोन्ही राजांमधील तणाव वाढला होता. त्यामुळे हे दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामावर आले तर संघर्ष विकोपाला जावू शकतो हे ओळखून पोलीस नेहमी सज्ज असतात. रविवारी मात्र अनपेक्षितपणे दोन्ही राजे एकाचवेळी शासकीय विश्रामधामावर आल्याने पोलिसांची जोरदार धावपळ झाली.
ना. रामराजे  रविवारी दुपारी 1 नंबरच्या सूटमध्ये बसले होते. त्यादरम्यान खा. उदयनराजे शासकीय विश्रामगृहाकडे येणार असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. त्यानुसार ते आलेही. गाडीतून उतरताच शासकीय विश्रामगृहात एकच तारांबळ उडाली. खा. उदयनराजे येताच सातारा पोलीस अलर्ट झाले होते.  आता काय वादावादी होणार का, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. मात्र शासकीय विश्रामधामावर आलेले खा. उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रतापगड या सूटमध्ये गेले. पोलिसांनी गेल्यावेळी प्रमाणे सूट नंबर 1 ला आतून कुलूप लावून घेतले आणि तिकडे कोणी जावू शकणार नाही याची काळजी घेतली. खा.उदयनराजे आपल्या सूटमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करत बसले. त्यानंतर काही वेळाने ना. रामराजे आणि त्यांचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. त्यानंतर सर्व वातावरण निवळले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: