Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाढत्या महागाईच्या विरोधात आज भारत बंद
ऐक्य समूह
Monday, September 10, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn1
काँग्रेस-राष्ट्रवादी, डाव्या पक्षांची महाराष्ट्र बंदची हाक
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ, गगनाला भिडलेली महागाई, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष इत्यादी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी, कामगार संघटना, टॅक्सी, रिक्षाचालक संघटना, दुकानदार व व्यापार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. बंदमधून दूध पुरवठा, सर्व रुग्णालये, औषधांची दुकाने व  शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये स्वत:हून बंदमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे निरुपम यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून काँग्रेसने सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात आणि मुंबईत हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन निरुपम व मलिक यांनी केले आहे. या बंदमध्ये मुंबईतील दुकानदार, व्यापारी, पेट्रोल पंपचालक, रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्या संघटनांशी चर्चा सुरू आहे, असे निरुपम यांनी सांगितले. सोमवारी सकाळी दहापासून बंदला सुरुवात होईल. बंद पूर्णपणे शांततेत पार पडेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.   बंदमध्ये विविध क्षेत्रातील कामगार संघटना सहभागी होतील, अशी माहिती महाराष्ट्र संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक विश्‍वास उटगी यांनी दिली. बँक कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, मात्र बंदला पाठिंबा म्हणून त्या दिवशी कर्मचारी निदर्शने करतील, असे महाराष्ट्र बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
व्यापारी संघटनेचा सहभाग नाही
काँग्रेस व अन्य पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी जाहीर केले आहे.
‘भारत बंद’ला मनसेचा पाठिंबा
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आणि डाव्यांनी  सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.   
बंद असल्याने गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाणार्‍यांनी सोमवारी 5 नंतरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मनसेने केले आहे.
 पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही उद्याच्या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि या बंदमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेत आहोत, असे राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न असले तरी केंद्र आणि राज्य सरकारने त्यावर अव्वाच्या सव्वा कर लावले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाची सामान्य माणसांना झळ पोहोचत आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.  या बंदमधून दूध पुरवठा, रुग्णालये, औषधांची दुकाने, शाळा व  महाविद्यालांना वगळण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
हेच ते ‘अच्छे दिन’ शिवसेनेचा भाजपवर पोस्टर वार
शिवसेनेकडून मुंबईच्या रस्त्यांवर ‘अच्छे दिन’च्या शिर्षकाखाली पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर 2015 मधील इंधनाचे दर आणि 2018 मधील इंधानाच्या दरांमधील फरक मांडण्यात आला आहे. त्यासोबत हेच का ते अच्छे दिन, असा बोचरा सवाल करण्यात
आला आहे.
‘बहुत हुई पेट्रोल-डिझेल की मार’, ‘अब की बार मोदी सरकार’, आणि ‘अच्छे दिन, आयेंगे’, असे म्हणत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशातील जनतेला इंधन दरवाढ कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य माणूस कसा त्रस्त आहे, हे दाखवण्यासाठी भाजपने देशभरात ‘बॅनरबाजी’ केली होती. भाजपने मुंबईतील अनेक भागात ‘अच्छे दिन, आयेंगे’,चे बॅनर लावले होते. भाजपला याची आठवण करून देत शिवसेनेने बॅनर लावले असून ‘हेच का अच्छे दिन’, असा सवाल भाजपला
विचारला आहे.
‘भारत बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा नाही
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नसल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षाला उशिरा जाग आली आहे. आम्ही आधीपासून महागाई वाढल्याचे सांगत आलो आहोत. विरोधी पक्ष अपयशी ठरल्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: