Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओंड येथे भोंदूबाबाला अटक
ऐक्य समूह
Monday, September 10, 2018 AT 11:45 AM (IST)
Tags: re1
जादू टोण्याचे साहित्य, दागिने व रोख रकमेसह 72 हजार रूपये जप्त
5कराड, दि.9 : दैवी चमत्काराचा दावा करुन स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचे सांगत ओंड, ता. कराड येथील घरात रेणुका देवीचा दरबार भरवून लोकांना मुलगा होण्यासाठी, नोकरीसाठी, घरगुती अडचणी दूर होण्यासाठी, कामधंदा मिळण्यासाठी, लग्न जमण्यासाठी, जमिनीचा वाद मिटण्यासाठी उपाय सांगून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या भोंदू बाबा शंकर भीमराव परदेशी उर्फ आप्पा (वय 55) यास ओंड येथील वीज कंपनी कार्यालयापासून बेंद वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरील घरात अंनिसच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग व कराड तालुका पोलिसांच्या सहकार्याने रविवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी आप्पाला अटक करुन त्याच्या घरातून लोकांकडून देवाच्या नावाखाली घेतलेले देव्हार्‍यातील सुमारे 39 हजार 305 रुपये, सोन्याचे दागिने, पोषाख, जादू टोण्याचे साहित्य असा सुमारे 72 हजार 952 रुपयांचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कराड तालुक्यातील ओंड येथे गेली वीस वर्षांपासून शंकर भीमराव परदेशी उर्फ आप्पा या भोंदू बाबाने बाजार मांडला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी अंनिसकडे तक्रार झाल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याची खात्री करून घेतली होती. सुनील विश्‍वास काळे, रा. चरण, ता. शाहूवाडी (कोल्हापूर) हा त्यास कामधंदा मिळण्यासाठी तसेच घरातील अडचण दूर होण्यासाठी शंकर परदेशी याच्याकडे सुमारे 2 ते 3 महिन्यांपासून पूजा विधी करण्याकरता फेर्‍या मारत होता. त्याला कामधंदा मिळावा व घरातील अडचणी दूर व्हाव्यात याकरता भोंदू बाबाने देवाचे भागविण्यासाठी 10 हजार रुपयांचा खर्च लागेल, असे सांगितले होते. त्यावर अडचणीत असलेल्या सुनीलने दोन महिन्यांपूर्वी 10 हजार रुपये व्याजाने लोकांकडून घेवून भोंदू बाबाला दिले होते. परंतु, सुनीलला सदर पूजा विधीचा कोणताही फायदा होत नसल्याचे जाणवल्यामुळे त्याने सुरुवातीस सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सांगून देवाधर्माच्या नावाखाली भोंदूबाबा
सुनील काळे प्रमाणेच इतर लोकांनाही लाखो रुपयांचा गंडा घालत असल्याचे सांगितले. त्यानंतर रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते कराडात येवून कराडचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचे पोलीस पथक सोबत घेवून तक्रारदार व पंचासह ओंड येथील भोंदूबाबाच्या घराजवळ गेले. यावेळी भोंदूगिरी करताना भोंदू बाबा शंकर भीमराव
परदेशी यास ताब्यात घेतले. त्याच्या देवघराच्या झडतीमध्ये लोकांकडून देवाच्या नावाखाली घेतलेले देव्हार्‍यात ठेवलेले सुमारे 39 हजार 305 रुपये, सोन्याचे दागिने, पोषाख, जादू टोण्याचे साहित्य असा सुमारे 72 हजार 952 रुपयांचा माल पोलिसांना मिळून आला.
यावेळी भोंदूबाबाकडे इतर चार भाविक नोकरी करता, घरगुती अडचणी सोडविण्याकरता आल्याचे आढळून आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय
पवार, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक पद्मकार घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक फौजदार विजय जाधव, पृथ्वीराज घोरपडे, पोलीस नाईक प्रमोद सावंत, नीलेश काटकर, मयूर देशमुख, मोहसीन
मोमीन, विजय सावंत, सागर बर्गे, रमेश बरकडे, दीपक साठे व दीपक कोळी यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: