Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन्ही काँग्रेससह समविचारींचे आज सातारा बंदचे आवाहन
ऐक्य समूह
Monday, September 10, 2018 AT 11:44 AM (IST)
Tags: lo2
भारत बंदच्या निमित्ताने चार वर्षांनी दोन्हीकाँग्रेस एकत्र
सातारा, दि. 9 : भारत बंदच्या निमित्ताने तब्बल चार वर्षांनी सातारा जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि तेही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष निषेध, मोर्चा आणि बंद अशा आंदोलनामध्ये नेहमीच मागच्या पायावर उभे असतात. त्यामुळे ही आंदोलने कशी यशस्वी करायची याचा अनुभव त्यांच्या गाठीशी नसतो. त्यामुळे पत्रकारांनीही वेगवेगळे प्रश्‍न विचारुन त्यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार परिषदेत बंद यशस्वी करायचा निर्धार बोलून दाखवत त्यांनी बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, सातारा शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग,   महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, युवक काँग्रेसचे दयानंद भोसले उपस्थित होते.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, अनेक वेळा गोड खाल्ले, की खर्डा खावा वाटतो तसा भाजपा सरकारच्या खर्ड्याचा जनता आस्वाद घेत आहे. जनसंघर्ष यात्रेची कोल्हापूर येथून चांगली सुरुवात झाली. कराडमध्ये भाजपने ज्या वेदना दिल्या त्याची दहीहंडी फोडली, पुणे येथे समारोप झाला. आ. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, मल्लिकार्जुन खरगे, आ. पृथ्वीराज चव्हाण ही मान्यवर मंडळी यात्रेत सहभागीझाली होती.   सध्याच्या भाजपा-सेनेच्या सरकारने सर्वसामान्य लोकांचे जीने हराम केले आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. सरकारचे कसलेही नियोजन  नाही. जीवनावश्यक वस्तूंपासून सर्वच महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी असताना इकडे देशात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. व्यापार्‍यांनाही हाल सोसावे लागत आहेत. बंदमध्ये समविचारी पक्ष सहभागी होणार आहेत.
सुनील माने म्हणाले, सरकारने कोणताच प्रश्‍न नीट सोडवला नाही. कर्जमाफी आर्थिक वर्षात सरसकट द्यायला हवी होती, ती  दिली गेली नाही. अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आजही भिजत ठेवले आहे. नोटाबंदीचा निर्णय घेताना अनेक बाबी चुकीच्या झाल्या. त्यांना सरकार चालवता येत नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: