Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुख्यात गुंड बाबा मोरे व साथीदाराकडून गावठी पिस्तुल जप्त
ऐक्य समूह
Monday, September 10, 2018 AT 11:47 AM (IST)
Tags: re3
विंग येथे दोघांना अटक: पिस्तुलसह मॅगझीन व पुंगळ्या जप्त
5कराड, दि.9 : विंग, ता. कराड येथील हॉटेल सागर परमीट रूमच्या समोरील रस्त्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून कुख्यात गुंड बाबासाहेब रघुनाथ मोरे (रा. पाचुपतेवाडी-तुळसण) व अरुण मारुती कणसे (रा. विंग) या दोघांना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या अंग झडतीत सुमारे 25 हजार रुपये किमतीची अवैध गावठी बनावटीची पिस्तुल, मॅगझीन व दोन पुंगळ्या मिळून आल्या. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शनिवारी रात्री 11 च्या सुमारास विंग येथील हॉटेल सागर परमीट रुम परिसरात दोन इसम गावठी पिस्तुल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती कराड तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना मिळाली होती. या माहितीवरुन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, हवालदार महेश सपकाळ, अमित पवार, शशिकांत काळे यांनी खात्री करुन सापळा रचला. यावेळी विंग येथील हॉटेल सागर परमीट रुम परिसरातील रस्त्यावर बोलत उभे असलेल्या दोघांचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोघांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत अंग झडती घेतली असता बाबासाहेब रघुनाथ मोरे (वय 45) याच्याकडे सुमारे 25 हजार रुपये किमतीचे एक सिल्व्हर कलरचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आढळून आले. तर त्याचा साथीदार अरुण मारुती कणसे (वय 28) याच्या खिशात दोन रिकाम्या पुंगळ्या मिळून आल्या. दरम्यान, बाबा मोरे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही पै. संजय पाटील खून खटल्यात तसेच अपहरण, विनयभंग व अवैध शस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी कराड शहर व तालुका पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, हवालदार महेश सपकाळ, अमित पवार, शशिकांत काळे, धनंजय कोळी, अमोल पवार, शशिकांत घाडगे यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: