Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सेवानिवृत्त शिक्षकाला ऑनलाइन सव्वाचौदा लाखांचा गंडा
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re1
विमा पॉलिसी रक्कम काढण्याच्या बहाण्याने फसवणूक
5कराड, दि. 11 : आगाशिवनगर येथील सेवानिवृत्त शिक्षकाला नोएडा येथील विमा पॉलिसी कंपनीत असलेली रक्कम काढण्याच्या बहाण्याने मोबाईलवरून ऑनलाइन सव्वा चौदा लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, रा. बालाजी कॉलनी, आगाशिवनगर, रा. साळशिरंबे, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जगनमोहन सक्सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू, सत्यजित पाठक, रामकुमार यादव, राजसिंग मल्होत्रा व दीनदयाळ रेड्डी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संभाजी दाभोळे यांना जानेवारी 2016 पासून मोबाईलवर सोनिया शर्मा नावाच्या महिलेचा कॉल वारंवार येत होता. नोएडा येथील विमा पॉलिसी कंपनीत तुमच्या नावे 2 लाख रुपये आहेत, असे ती सांगत होती. पाच ते सहा वेळा कॉल आल्यानंतर दाभोळे यांना यात काही तरी सत्य असावे असे वाटल्याने त्यांनी त्या महिलेकडे अधिक चौकशी केली. त्या महिलेने दाभोळे यांचे जगनमोहन सक्सेना यांच्याशी बोलणे करून दिले. तुमचे 2 लाख मिळवण्यासाठी तुम्हाला 30 हजार भरावे लागतील, असे सांगितले.   
या बोलण्यातूनच दाभोळे यांनी 23 फेब्रुवारी 2016 मध्ये 15 हजार 500 रुपयांची पॉलिसी केली. त्यानंतर वारंवार दाभोळे यांनी त्यांच्या व पत्नीच्या नावे वेगवेगळ्या पॉलिसी करून रक्कम भरली. मुलीच्या व जावयाच्या नावेही पॉलिसी केली. या काळात दाभोळे यांचे सक्सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू यांच्याशी वारंवार बोलणे झाले. काही कालावधी उलटल्यावर आपल्या पैशाचे काय झाले हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता पलीकडून सत्यजित पाठक नावाची व्यक्ती  बोलत होती. पाठक यांनी दाभोळे यांना सर्व माहिती विचारून तुमच्या नावे 24 लाख 73 हजार जमा असल्याचे सांगितले. पण ते पैसे तुम्हाला हवे असतील तर कागदपत्रे व काही पैसे कमिशन म्हणून लागतील, असे सांगितले. दाभोळे यांनी पाठक यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर कागदपत्रे पाठवली. त्यानंतर पाठक याने भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे एक पत्र दाभोळे यांना व्हॉटसअ‍ॅपवर पाठवले. त्यानंतर तुमच्या खात्यावर 47 लाखांपेक्षा जास्त रक्कम असून हा काळा पैसा आहे, अशी भीती दाखवली. यासाठी न्यायालयात क्लिनचीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही धमकावले. त्यानंतरही दाभोळे यांच्याकडे पैशाची मागणी झाली. दाभोळे यांनी भीतीपोटी त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा बँकेच्या खात्यातून एकूण 14 लाखांपेक्षा जास्त रक्कम संशयित सांगतील तशी ऑनलाइन जमा केली. कालांतराने त्या संशयितांशी संपर्क होण्यात अडचणी निर्माण झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे दाभोळे यांची खात्री पटली. त्यामुळे दाभोळे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दाखल केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: