Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वरकुटे-मलवडी येथे अज्ञात रोगाने 85 जनावरे दगावली
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re2
मेंढपाळांचे सुमारे 10 लाखांचे नुकसान
5पळशी, दि. 11 : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी परिसरातील मेंढपाळाची अज्ञात रोगाने लहान-मोठी 85 हून अधिक जनावरे मुत्यूमुखी पडल्याने मेढपाळांचे सुमारे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले आहे. या जनावरांच्या रोगाचे निदान पशुवैद्यकीय विभागाला अद्याप झाले नसल्यामुळे शेळ्या-मेढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. मंगळवार, दि.11 रोजी 3 शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू झाला आहे.
वरकुटे-मलवडी परिसरातील वाघमोडेवस्ती, मिसाळ वस्ती येथील शेतकर्‍यांच्या शेळ्या-मेढ्या मोठ्या प्रमाणात दगावल्याने मेंढपाळ व शेतकर्‍यांना आपल्या डोळ्यासमोर जनावरे दगावत असल्याचे पाहून अश्रू आवरता येत नाहीत. यामध्ये महादेव अण्णा वाघमोडे यांच्या 32 मेंढ्या व 1 रेडकू, सदाशिव अण्णा वाघमोडे यांच्या 20 मेढ्या, पोपट दर्याबा मिसाळ यांच्या 3 शेळ्या, मारुती जयाप्पा मिसाळ यांची 1 शेळी व 1 रेडकू, लक्ष्मी दादा वाघमोडे यांच्या 2 शेळ्या, कैलास नाना मिसाळ यांच्या 4 शेळ्या व 10 करडे, भाऊ लक्ष्मण मिसाळ यांच्या 4 मेंढ्या, तातोबा पांडुरंग मिसाळ 4 शेळ्या, नामदेव साधू मंडले यांची 1 शेळी, लहू गोविंद वनवे यांची 1 म्हैस व 1 जर्सी गाईचा समावेश आहे.
वरकुटे-मलवडी परिसरात अचानक अज्ञात रोगाचा फैलाव झाल्याने सुमारे 85 हून अधिक लहान मोठी जनावरे दगावली आहेत. संबंधित मेंढपाळ व शेळीपालन करणार्‍या कुटुंबास लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
या अज्ञात रोगाचे तज्ञांकडून निदान करून लसीकरण व तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणीही होत आहे. संबंधित अधिकार्‍यांनी सद्य स्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना करावी व रोगाचे निदान करून औषधाचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
घटनास्थळीच जनावरांचे शवविच्छेदन
वरकुटे-मलवडी येथील जनावरे दगावल्याची संख्या वाढत गेल्याने पशुधन अधिकारी डॉ. रणजित भांगे यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यानंतर म्हसवडचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. ए. बी. सरडे व पळशीचे पशुधन अधिकारी डॉ. अमोल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत जनावरांचे शवविच्छेदन करुन लोणंद येथील ओमिका लॅबमध्ये नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
दूषित पाण्यामुळे लिव्हर फ्युक
वरकुटे-मलवडी परिसरातील डबक्यातील दूषित पाणी पिल्याने लिव्हर फ्युक झाल्याचा अंदाज आहे. ते दूषित पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
- डॉ. अमोल जाधव, पशुधन अधिकारी, पळशी.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: