Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
25 गुन्हे करणारी टोळी एलसीबीने पकडली
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo2
कास, कण्हेर धरण परिसरात प्रेमी युगुलांना लुटले; दोन तलवारी, मिरची पूड जप्त
5सातारा, दि. 11 : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले आहे. या टोळीने कास, कण्हेर धरणासह ठिकठिकाणी प्रेमी युगुलांची लूटमार केली असल्याची कबुली दिली आहे. सर्व संशयित बुधवालेवाडी, ता.खटाव येथील असून त्यांच्याकडून दोन तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितांनी लूटमार, दुचाकी चोरीसह 25 गुन्हे केले असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. ही टोळी प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची किरण बाळू बुधावले (वय 23), सतीश देवबा बुधवाले (वय 19), अक्षय लक्ष्मण बुधावले (वय 19), बाळू अंकुश बुधावले(वय 20, सर्व रा.बुधावलेवाडी) व अजय श्रीरंग जाधव (वय 27, रा.चिंचणी, ता.खटाव) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा-पुसेगाव रस्त्यावर विसापूर फाट्यावर काही संशयित दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला समजली. त्यानुसार दि. 8 रोजी पोलिसांनी सापळा लावला असता त्यामध्ये वरील सर्व संशयितांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांकडे कसून चौकशी  केली असता त्यांच्याकडून दोन तलवारीसह मिरची पूड व इतर दरोड्याचे साहित्य आढळले. संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी टोळीच्या माध्यमातून कास, कण्हेर धरण, मेढा परिसर तसेच गणपतीचा माळ, ता.खटाव येथे पर्यटक व प्रेमी युगुलांची लूटमार करुन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले असल्याच्या 9 गुन्ह्यांची कबुली दिली. घरफोडी केल्याच्या 3 गुन्ह्यांची कबुलीही दिली. याशिवाय नेर, डिस्कळ, ता.खटाव, आंदरुड, ता.फलटण, स्वारगेट एस.टी. स्टँड येथील 4 पल्सर व 1 स्प्लेंडर अशा 5 दुचाकी चोरल्या. शेतीवरील इलेक्ट्रिक मोटारी व निर्जन परिसरात एकट्याला गाठून अनेक जबरी चोरी केल्याची कबुलीही संशयित चोरट्यांनी दिली. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांची खातरजमा केली असता एकूण 25 गुन्ह्यांची कबुली संशयित चोरट्यांनी दिली आहे. 
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, फौजदार प्रसन्न जर्‍हाड, शशिकांत मुसळे, पोलीस हवालदार सुरेेंद्र पानसांडे, विजय जाधव, मोहन घोरपडे, विजय शिर्के,
तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले,
नीलेश काटकर, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: