Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गणेश विसर्जनाच्या प्रश्‍नाचा तिढा वाढला; आज पुन्हा बैठक
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn1
फक्त दीड दिवसांच्या घरगुती विसर्जनावर निर्णय
5सातारा, दि. 11 : सातारा शहरातील गणेश विसर्जन कोठे करायचे यावरचा अधिकृत निर्णय तब्बल चार तासांच्या बैठकीनंतरही जाहीर करण्यात आला नाही. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीही रात्रीउशिरापर्यंत विसर्जनावर काही निर्णय दिला नाही. विसर्जनासाठी मंगळवार तळे खुलेझाल्याचे साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी एकिकडे जाहीर केले असताना त्यांच्याच आघाडीच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी न्यायालयाचा निर्णय माझ्या हातात नाही. त्यामुळे आता त्यावर काही बोलू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे विसर्जनाच्या प्रश्‍नाचा तिढा वाढला आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक पोलिसांनी बोलावली आहे. त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
पोलिसांनी गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन या पार्श्‍वभूमीवर अलंकार हॉलमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय काय आला आहे याची प्रत दाखवावी आणि तो निर्णय वाचून दाखवावा, अशी मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय आला नसल्याचे सांगत न्यायालयाने काय निर्णय दिला हे तोंडीच मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी वाचून दाखवले.           
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी विसर्जनाच्या प्रश्‍नावर सातारा नगरपालिकेने निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. आमची जबाबदारी फक्त कायदा व सुव्यवस्था राखण्याची आहे, असे सांगितले. शांतता कमिटीच्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी माझ्या कार्यालयात बैठक घेवू, असे सांगितले. त्यानंतर निवडक जणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. एकूणच सगळ्या पर्यायावर तिथे चर्चा झाली. मंगळवार तळे हेरिटेज असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्था आहे का, असा प्रश्‍नही विचारण्यात आला. कृत्रिम तळे आणि गोडोली तळे याचाही विचार विसर्जनासाठी करावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. मात्र सर्वच विषय अधांतरी असल्यासारखी चर्चा झाली. अंतिम निर्णय होवू शकला नाही.
दीड दिवसांच्या घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. गोडोली येथे कल्याणी शाळा, सदरबझार येथे दगडी शाळा, पोहण्याचा तलाव, हुतात्मा स्मारक येथे दीड दिवसाचे गणेश विसर्जन होणार आहे. 12 फुटाच्या गणपती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्थेवर विचार करण्यात आला. त्यामध्ये मंगळवार तळे, गोडोली तळे याशिवाय हुतात्मा स्मारक येथे  कृत्रिम तळे काढता येईल का या पर्यायावर विचार करण्यात आला. त्यावर अशोक मोने, अशोक घोरपडे यांनी रविवार पेठ पोलीस चौकी येथे नगरपालिकेची जागा आहे आणि तेथे कृत्रिम तळे काढावे, अशी सूचना मांडली. त्यासाठी तुम्ही डिझेल द्यावे. आम्ही मशिनरी पुरवतो, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकार्‍यांविरोधात न्यायालयात जाणार
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हातात येण्यापूर्वी मंगळवार तळ्यात विसर्जन करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली येवून विसर्जनाचा निर्णय घेतल्यास त्यांच्या विरोधातउच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे, असा इशारा सुशांत मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: