Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इंधन दरांचा नवा भडका सेन्सेक्स, रुपयाची नवी आपटी
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 11 (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले रुपयाचे अवमूल्यन लवकर थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. रुपयाने आज पुन्हा नवा नीचांक गाठला तर सेन्सेक्स आणि निफ्टीने नवी आपटी खाल्ली. दुसरीकडे इंधनाच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. दिल्लीत मंगळवारी पेट्रोल 80.87 रुपये तर मुंबईत 86.26 प्रतिलिटर झाले होते. डिझेल अनुक्रमे 72.97 आणि 77.47 रुपये झाले होते. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 72.73 अशी नवी नीचांकी पातळी नोंदवली. परिणामी सेन्सेक्सचा निर्देशांक 509.4 अंशांनी तर निफ्टी 150.60 अशांनी घसरला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने तब्बल 1 हजार अंशांनी आपटी खाल्ली आहे. ही पडझड अजून काही दिवस सुरू राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे असून या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण आणि अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे शेअर बाजार सलग दुसर्‍या दिवशी कोसळला. डॉलरच्या तुलनेत रुपया हे आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन बनले आहे. 
सेन्सेक्स 37,413.13 अंशांवर तर निफ्टी 11,287.50 अंशांवर बंद झाला. सोमवारीही सेन्सेक्सने 467.65 अंशांची गंटागळी खाल्ली होती. त्यामुळे दोन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची एक हजार अंशांनी पडझड झाली. डॉलरच्या तुलनेत गेल्या आठवड्यातील शेवटचे सत्र वगळता रुपयाचे अवमूल्यन सलग होत आहे. रुपयाच्या मूल्यात 2018 मध्ये आतापर्यंत 13 टक्क्यांची घसरण झाली आहे.
इंधन दरांचा भडका सुरूच
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलांच्या दरांमधील वाढीचा परिणाम पेट्रोल व डिझेलच्या दरात पुन्हा भडका उडण्यात झाला. आज दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये प्रत्येकी 14 पैशांची वाढ झाली. त्यामुळे दोन्ही इंधनांनी मंगळवारी नवा उच्चांक गाठला. दिल्लीत पेट्रोल 80.87, मुंबईत 86.26, कोलकात्यात 83.75 आणि चेन्नईत 84.07 रुपयांवर पोहोचले. डिझेलने दिल्लीत 72.97, मुंबईत 77.47, चेन्नईत 77.15 आणि कोलकात्यात 75.82 रुपये प्रतिलिटर अशी पातळी गाठली होती. केंद्र सरकारकडून लावण्यात येणारा
अबकारी कर, राज्यांचा व्हॅट आणि पंपचालकांचे
कमिशन यामुळे पेट्रोल व डिझेलच्या मूळ किमतीत जवळपास दुप्पट वाढ होत असते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: