Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विसर्जनाच्या प्रश्‍नावर नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांना जबाबदार धरणार
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
पोलीस अधीक्षकांची कडक नोटीस
5सातारा, दि. 11 : गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग व स्थळे याबाबत जनतेमध्ये संभ्रम, असंतोष व अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो हे टाळण्यासाठी विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळे याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा व घेतलेल्या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी देऊन नागरिकांच्यामध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करावी. विसर्जन मार्ग व स्थळे याबाबत तत्काळ निर्णय जाहीर न केल्यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी नोटीस नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गणेश विसर्जनाच्या प्रश्‍नावरून दिली आहे.
नगराध्यक्षांना दिलेल्या नोटिसीत जिल्ह्यात दि. 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव सण साजरा होणार आहे. सन 2015 पूर्वी सातारा शहरातील मंगळवार तळे, फुटके तळे व मोती तळे या तळ्यात खासगी व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. परंतु 2015 मध्ये सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्रमांक 6775/2015 दाखल केली होती. त्यात सातारा शहरातील मंगळवार तळे, फुटके तळे व मोती तळ्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत सातारा नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सदर तळ्यात मूर्ती विसर्जनास बंदी केली आहे,  असे म्हणणे उच्च न्यायालयात दाखल केल्याने उच्च न्यायालयाने सदरची याचिका निकाली काढली आहे. या व्यतिरिक्त सातारा नगरपरिषदेच्या प्रतापसिंह शेतीशाळा, राधिका रोड, सातारा, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा, सदरबझार, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथे कृत्रिम तळे बनवून गणेश मूर्ती विसर्जन केल्या जात होत्या. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने यापूर्वी पोलीस प्रशासनाचेवतीने 12 जुलै, 20 ऑगस्ट, 5 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विसर्जन मार्ग व स्थळे निश्‍चित न झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यात व नागरिकांच्यात संभ्रम, असंतोष, अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषदेकडून गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व मार्ग निश्‍चित न झाल्यामुळे गणेश विसर्जनाचे अनुषंगाने कोणतीही पूर्वतयारी केले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम, असंतोष व अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सन 2018 मध्ये गणेशोत्सवास कमी कालावधी राहिलेला असून दि. 14 पासून दीड दिवसाचे तसेच 3, 5, 7, 9, 10 दिवसांचे घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. अनंतचतुर्दशी दिवशी उर्वरित सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे नगरपरिषद साताराच्यावतीने अद्यापपर्यंत विसर्जन मार्ग व ठिकाणे निश्‍चित केलेली नाहीत. आपण कोणकोणती गणेश विसर्जन ठिकाणे व कृत्रिम तळे उपलब्ध केली आहेत त्याची माहिती कार्यालयास कळवावी, असे नोटिसीत म्हटले आहे.
    

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: