Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘सह्याद्रि’स उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाबद्दल पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 11 : यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन 2017-18 सालासाठी नॅशनल फेडरेशनच्यावतीने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी, उत्तर प्रदेशचे ऊसमंत्री सुरेश राणा, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सोमवारी प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, चीफ डायरेक्टर ऑफ शुगर जी. एस. साहू तसेच देशातील सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरचा पुरस्कार सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांनी संचालक मंडळ व अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सर्व मान्यवरांनी चेअरमन आ. बाळासाहेब पाटील व त्यांच्या संचालक मंडळाचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले.   
कार्यक्रमानंतर बोलताना चेअरमन आ. बाळासाहेब पाटील म्हणाले,  सह्याद्रि कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी आम्हा संचालकांना घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे साखर उत्पादन खर्चामध्ये काटकसर करण्यासाठी सातत्याने लक्ष देत आहोत. साखर उत्पादनामध्ये काटकसर करत असताना ऊस उत्पादकांना त्यांंच्या उसावर वरच्या क्रमांकाचा  दर दिलेला आहे.  असा वरच्या क्रमांकाचा ऊस दर देवूनही कारखान्याची सांपत्तिक स्थिती देशात पहिल्या क्रमांकाची राखली आहे. नॅशनल फेडरेशनने कारखान्याचा शिल्ड व प्रशस्तिपत्रक देवून गौरव केला. शाबासकी दिली, त्याबद्दल आनंद झाला. हे यश कारखान्याचे संचालक मंडळ, सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे कर्मचारी यांच्या सहकार्यातून मिळालेले आहे. यापूर्वीही सह्यद्रि कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्याकडून देशपातळीवरील 2011-12 सालासाठी प्रथम व सन 2012-13 सालासाठी द्वितीय क्रमांकाचे उत्कृष्ट  आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आर्थिक व्यवस्थापनाबद्दल सन 2015-16 सालासाठी राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
तसेच उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व ऊस विकास पुरस्कारानेही यापूर्वी सह्याद्रि कारखान्याचा गौरव झाला आहे. कारखाना दरवर्षी कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढीबरोबरच जास्तीत जास्त हेक्टरी उत्पादन मिळण्यासाठी ऊस विकासाच्या योजना राबवून सभासद शेतकर्‍यांना रासायनिक, कंपोस्ट खत, जैविक खत, हिरवळीचे खत आदींचे वाटप करण्यात येते आणि वेळोवेळी ऊस उत्पादकांकरिता मेळावे आयोजित करून, हेक्टरी उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करून ऊस विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहे.  

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: