Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मागासवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn3
15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल देण्याचे निर्देश
5मुंबई, दि. 11 (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना मागासवर्ग आयोगाने आज मुंबई उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर केला. अंतिम अहवाल येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाने आज मुंबई उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर केला. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे आयोगाच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले असता, अंतिम अहवाल सादर करेपर्यंत दर चार आठवड्यांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षात मराठा समाजाने प्रचंड मोर्चे काढले होते. दोन महिन्यापूर्वी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली होती.
यापूर्वी 7 ऑगस्टला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी झाली असता, हा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने आंदोलन करणे योग्य नाही, अशी टिपण्णी उच्च न्यायालयाने केली होती. त्यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर या याचिकेवर पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. या आधीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला वेगाने काम करण्याचा सूचना दिल्या होत्या. राज्यात होणारी आंदोलने आणि आत्महत्यांची आम्हाला चिंता आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. सप्टेंबरच्या  दुसर्‍या आठवड्यात आयोगाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. तोपर्यंत आंदोलने करू नयेत. कृपया आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलू नका, असा सल्लाही उच्च न्यायालयाने दिला होता.
आणखी एक आत्महत्या
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगाव येथे आज पुन्हा एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. किशोर शिवाजी हार्दे असे त्याचे नाव असून मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर मृताच्या नातेवाइकांना दहा लाखाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: