Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
ऐक्य समूह
Wednesday, September 12, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: na1
पंतप्रधानांची घोषणा; बाप्पा पावला
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. पंतप्रधानांनी अंगणवाडी सेविकांशी ‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’च्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी माधनात वाढीची घोषणा केली.
देशभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होईल. आतापर्यंत ज्या अंगणवाडी सेविकांना 3 हजार रुपये मानधन मिळत होते, त्यांना आता 4,500 रुपये मिळणार आहेत. ज्यांना 2200 रुपये मिळत होते. त्यांना 3,500 रुपये मिळणार आहेत. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही 1500 रुपयांवरुन 2250 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. आशा कार्यकर्त्यांना मिळणार्‍या नित्य प्रोत्साहनात दुप्पट वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. सर्व आशा कार्यकर्त्या व मदतनीसांना ‘पंतप्रधान जीवनज्योती विमा’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा’ या योजनांतर्गत मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे. ‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणार्‍या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले असून ते कामगिरीवर आधारित 250 रुपयांपासून 500 रुपये असेल. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या घोषणेमुळे पोषण अभियानांतर्गत सेवा अधिक सुधारेल, असे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे. या वाढीचा लाभ 14 लाखांपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: