Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजप-काँग्रेसमधील युद्धाला मल्ल्याचे ‘स्पिरीट’
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: na1
अरुण जेटलींच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी गांधी कुटुंबाची मल्ल्यावर मेहेरबानी : भाजपचा आरोप
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपयांना चुना लावून ब्रिटनमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने देश सोडण्यापूर्वी आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कर्जफेडी संदर्भात तडजोडीचा प्रस्ताव दिला होता, असा खळबळजनक दावा बुधवारी केल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू झाले आहे. मल्ल्याचा दावा फेटाळताना जेटली यांनी काल त्याला भेटीची वेळ दिली नव्हती आणि त्याने कोणताही लिखित प्रस्ताव दिला नसल्याचे तातडीने स्पष्ट केले होते. त्यावर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मल्ल्या व जेटली यांचे संगनमत होते असे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर भाजपनेही पलटवार केला असून उलट मल्ल्यावर गांधी कुटुंबीयांनी मेहरबानी केल्यानेच त्याला विनासायास हजारो कोटींचे कर्ज मिळाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
मल्ल्याची आपल्यासमवेत कोणतीही बैठक झाली नसल्याचे जेटली यांनी काल फेसबुक ब्लॉगच्या  माध्यमातून स्पष्ट केले असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र या दोघांची भेट झाली होती, असा दावा आज केला आहे. जेटली आणि मल्ल्या यांची संसदेत 15 मिनिटे भेट झाली होती. मल्ल्या भारतातून पळून जाणार असल्याचे जेटलींना माहीत होते. त्यामुळे त्याला वाचवण्याचे काही आदेश होते का? असा सवाल करतानाच जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार पी. एल. पुनिया हजर होते. पुनिया यांनी दिलेल्या माहितीवरूनच राहुल गांधी यांनी जेटली-मल्ल्या भेट 15 मिनिटांची असल्याचा दावा केला आहे. या घटनेचे साक्षीदार पुनिया आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. अर्थमंत्री आर्थिक घोटाळेबाजाशी चर्चा करतात. तो त्यांना देश सोडणार असल्याचे सांगतो तरी जेटली ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेला त्याची माहिती देत नाहीत. जेटली खोटे बोलत असून मल्ल्या संगनमतामुळेच फरार होऊ शकला. त्यामुळे जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेच्या आधीही राहुल गांधी यांनी ट्विट करून जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
सीसीटीव्ही फुटेज तपासा
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 1 मार्च 2016 रोजी जेटली व मल्ल्या हे दोघे संसदेत किमान 15 मिनिटं एकमेकांशी बोलत असताना मी पाहिले. आधी दोघे उभे राहून बोलत होते. नंतर सेंट्रल हॉलमध्ये जाऊन त्यांनी बसून चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांनी मल्ल्या देश सोडून पळाला. या प्रकरणी संसदेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्यातून सत्य बाहेर पडेल. मी खोटे बोलत असेन तर मी राजकारण सोडेन अन्यथा जेटलींनी राजकारण संन्यास घ्यावा, असे आव्हानही पुनिया यांनी दिले.
मल्ल्याला काँग्रेसचीच मदत : गोयल
दरम्यान, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जेटली यांच्यावर आरोप केल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर पलटवार केला. राहुल गांधी आणि मल्ल्या यांच्यात खोटे बोलण्याची जुगलबंदीच सुरू झाली असून ते पुन्हा पुन्हा खोटे बोलत आहेत. काँग्रेसचे आरोप म्हणजे खोटेपणाची खाण आहे, असा घणाघात गोयल यांनी केला.
आमच्या सरकारने मल्ल्याला कोणतेही कर्ज वा सवलत दिलेली नाही. जे झाले, ते तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात झाले. गांधी कुटुंबीय आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मल्ल्याला मदत केली. 2010 पासून यूपीएने मल्ल्या आणि किंगफिशरला दिलासा देण्यासाठी नियम तोडले, असे आरोप गोयल यांनी केले. यूपीए सरकारने मल्ल्याला कर्ज दिले. रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकण्यात आला. यूपीए सरकारने मल्ल्याला सवलत दिली. यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हानही गोयल यांनी दिले. ज्या कुटुंबाने आणि पक्षाने देशाला लुटले, ते आता खोटे बोलून स्वत:चा बचाव करत आहेत. मल्ल्याचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. प्रत्येक गुन्हेगार काहीही बोलला तरी त्यावर विश्‍वास ठेवण्यात अर्थ नाही, असेही गोयल म्हणाले. मल्ल्या आणि जेटली यांच्या भेटीबाबत पुनिया यांचा दावा खोटा आहे. ते आपले वक्तव्य वारंवार बदलत आहेत. अडीच वर्षांनंतर आता त्यांना या भेटीची आठवण कशी झाली? पुनिया स्वत: गोंधळलेले आहेत, असेही गोयल म्हणाले. पुनिया तेथे होते तर त्या चर्चेत सहभागी झाले होते का, असा सवालही गोयल यांनी केला. राहुल गांधींनी जेटलींचा राजीनामा मागण्यापेक्षा नॅशनल हेराल्ड प्रकरणी झालेल्या आरोपामुळे स्वत:च राजीनामा दिला पाहिजे, असेही गोयल म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: