Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोडोली आणि कण्हेर तलाव निश्‍चित
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: lo4
मिरवणुकीचा मार्गही पोलिसांकडून जाहीर; बंदोबस्तासाठी तीन हजार जणांची टिम
5सातारा, दि. 13 : गणेशोत्सवासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. गणेशोत्सवासाठी तब्बल 3 हजार जणांची फौज तैनात ठेवण्यात आली आहे. दरम्यान, सातारा शहरातील विसर्जनाची व्यवस्थाही पोलिसांनी सात ठिकाणी केली असून विसर्जन मार्गही जाहीर केला आहे. मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी कण्हेर खाण तलाव आणि गोडोली तळे येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट असून सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही पोलीस बंदोबस्त तैनात झाला आहे. गणेश विसर्जनापर्यंत पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलीस उपअधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 89 सहाय्यक पोलीस निरीक्षक व फौजदार, 2161 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त आहेे. याशिवाय 4 आरसीपीच्या तुकड्या, 2 एसआरपीएफच्या तुकड्या, 2 क्युआरटीच्या तुकड्या व 1 स्पेशल स्ट्रायकिंग फोर्सही तैनात राहणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न कोणीही निर्माण करू नये तसेच त्याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव मंडळे आणिघरगती गणेशाच्या विसर्जनासाठी नगरपालिका पोहण्याचा तलाव, हुतात्मा स्मारक कृत्रिम तलाव, भूविकास बँक चौक, सदरबझार येथे दगडी शाळा कृत्रिम तलाव, कल्याणी शाळा कृत्रिम तलाव, गोडोली तलाव आणि कण्हेर खाण तलाव, हॉटेल जलसागर शेजारी व्यवस्था   करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस प्रशासनातर्फे मंडळांच्या सोयीकरता योग्य ती उपाययोजना व व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मिरवणूक संपल्यानंतर चार फुटाच्या पुढील गणपती मूर्तींची मिरवणूक मोती चौकमार्गे प्रतापगंज पेठ-राधिका चौक, राधिका रोडने एस.टी. स्टॅण्डमार्गे-हुतात्मा स्मारक किंवा गोडोली कृत्रिम तलावाकडे जातील. गोडोली कृत्रिम तलाव या ठिकाणी 12 फुटाच्या आतील गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. 5 फुटावरील गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी कण्हेर व गोडोली तलाव ही दोन ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यासाठी भूविकास बँक चौक, हुतात्मा स्मारक या ठिकाणी नगरपालिकेतर्फे मूर्ती नेण्याकरता वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मूर्ती विसर्जनासाठी हुतात्मा स्मारक या ठिकाणी आपल्या गणेश मंडळाची मूर्ती घेवून कार्यकर्त्यांसह यावे तसेच जी मंडळे स्वत: कण्हेर या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाकरता नेणार असतील त्यांच्यासाठी कण्हेर तलाव या ठिकाणी नगरपालिकेतर्फे सर्व उपाययोजना केली आहे. जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी कण्हेर तलाव या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: