Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुक्यात सरपंचाला बेदम मारहाण
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
5म्हसवड, दि. 13 : माण तालुक्यातील गंगोती गावचे विद्यमान सरपंच दादासाहेब तातोबा झिमल यांना माजी सरपंच पोपट शामराव झिमल व इतर तिघांनी सागवानाच्या लाकडाने गुरुवारी बेदम मारहाण केली. लाकडाला असलेले खिळे लागून सरपंच दादासाहेब झिमल हे अक्षरश: रक्तबंबाळ झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गंगोती ग्रामपंचायतीची गुरुवारी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होती. या बैठकीत विकासकामांची चर्चा झाल्यावर सप्ताह बसवण्याबाबत चर्चा होऊन बैठक संपवण्यात आली. त्यानंतर सरपंच दादासाहेब झिमल हे घरी जात असताना मारूतीच्या मंदिराजवळ माजी सरपंच पोपट झिमल व इतर तिघांनी त्यांना अडवले. संशयितांनी त्यांना अचानक मारहाण करायला सुरुवात केली. या चौघांनी सागवानी  लाकडाच्या फळकुटाने दादासाहेब झिमल यांना डोक्यावर व हातावर मारहाण केली. फळकुटाला खिळे असल्याने या मारहाणीत झिमल यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला. मारहाणीनंतर ते जखमी अवस्थेत म्हसवड पोलीस ठाण्यात गेले. तेथे ठाणे अंमलदारांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: