Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात बाप्पांचे ढोल, ताशांच्या दणदणाटात जल्लोषात स्वागत
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn1
5सातारा, दि.13: गणपती बाप्पा मोरया...चा प्रचंड जयघोष करीत तसेच ढोल, ताशांच्या दणदणाटात जिल्ह्यात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात  भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करताना भक्तांनी डॉल्बीला फाटा देत ढोल, ताशांच्या प्रचंड गजराने व गणेशाच्या जयघोषाने स्वागत केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. जिल्ह्यात तब्बल 4 हजार 507 सार्वजनिक मंडळात गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 522 गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना स्वीकारली आहे.
गुरुवारी सकाळपासून गणरायाच्या स्वागतासाठी भाविकांनी डोक्यावर टोप्या घालून, हातात भगवे झेंडे घेवून पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटामध्ये गणरायाचे जोरदार स्वागत केले. बुधवारी दुपारपासूनच कुंभारवाड्यासह परिसरात घरगुती व मंडळांची गणेश मूर्ती नेण्यासाठी घाई सुरू होती. गुरुवारी सकाळी या ठिकाणी गणेश मूर्ती नेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दिवसभर शहरासह तालुक्यात अनेक भागातून  कुंभारवाड्यात दाखल झालेले गणेश भक्त आपल्या बाप्पाला ट्रॅक्टर, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांमधून प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी घेवून जात होते.
शहर पोलिसांनी अनेक मार्गावरील वाहतुकीत बदल केले होते. रस्त्यावर प्रचंड गर्दी असली तरी शिस्तबद्ध पद्धतीने मूर्ती नेल्या जात होत्या. 
गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर आज बैठक
5सातारा शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर  सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक शुक्रवार, दि. 14 रोजी दुपारी 1.30 वाजता सातारा नगरपरिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीस सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
गणेश पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच मोदक, मिठाई, सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत होती.
कराड तालुक्यात उत्साहात स्वागत
कराड शहरामध्ये सुमारे 350 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे असून तालुक्यामध्ये मंडळांची संख्या 742 इतकी आहे. कराड तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 129 गावांचा समावेश असून 34 गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला जात आहे. गुरुवारी दिवसभर गणेश मूर्ती नेण्याची मंडळांची घाई सुरू होती. शहरातील बहुतांश मंडळांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, कराड शहरासह ओगलेवाडी, कोपर्डे, मसूर, उंब्रज, तळबीड, विजयनगर, तांबवे, कोळे, विंग, मलकापूर, उंडाळे, काले, वाठार, रेठरे, शेणोली, वडगाव हवेली परिसरातही गणेश मूर्तींची पारंपरिक पद्धतीने उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.
शहर व परिसरात ठिकठिकाणी मंडळांनी आकर्षक कमानी उभारून विद्युत रोषणाईही केली आहे. मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्ती गेल्या दोन दिवसांपासून वाजतगाजत प्रतिष्ठापनेसाठी आणल्या जात होत्या. बाप्पांच्या आगमनामुळे कराड शहरासह तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गणेशभक्तांच्या आनंदाला भरते आले आहे. बाप्पांच्या स्वागत जलोषात करताना गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामुळे कराड शहरासह अवघा तालुका बाप्पामय झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: