Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करावे
ऐक्य समूह
Monday, October 08, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 7 : सातारा जिल्ह्याचे वातावरण हे स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक आहे. हा प्रदुर्भाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून त्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून त्यांचा उपयोग करावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी केले.
येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात स्वाईन फ्ल्यूू संदर्भात ना. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलीकर, उपविभागीय अधिकारी किर्ती नलावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार आदी यावेळी उपस्थित होते.
स्वाईन फ्ल्यूने 2009 पासून महाराष्ट्रात डोके वर काढले असून हे सर्वांसाठी आवाहन आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबाबरोबरच परिसरातील प्रत्येक घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करा. खासगी मेडिकलधारकांनी स्वाईन फ्ल्यूची औषधे त्यांना ठरवून दिलेल्या दरातच विक्री करावी. जादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा मेडिकल-धारकावर कारवाई केली जाईल. 
भविष्यात डेंगूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. वेळेत उपचाराने स्वाईन फ्ल्यू आजार निश्‍चितपणे बरा होऊ शकतो. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यावर मोफत उपचार केले जातात. डॉक्टरांनीही आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करुन स्वाईन फ्ल्यूचा
प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करावा, असे आवाहनही ना. डॉ. दीपक सावंत यांनी केले.
स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून उपाययोजना सुरु केल्या होत्या. स्वाईन फ्ल्यू लक्षणे व उपचार या विषयी वृत्तपत्रे, समाज माध्यमे यांचा वापर करुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. ज्या भागत
स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळत आहेत. त्या भागातील प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. स्वाईन फ्ल्यूचा
आणखीन प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी
यावेळी केले.
स्वाईन फ्ल्यू रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र ओपीडी केल्या आहेत. आरोग्य विभागाकडे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्या खासगी मेडिकलधारकांकडे स्वाईन फ्ल्यूची औषधे आहेत. त्या मेडिकलधारकांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूू संदर्भात 30 हजार पत्रके वाटप करण्यात आली आहेत. यापुढे एस. टी.मधून प्रवास करणार्‍या प्रवशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वाईन फ्ल्यूूचे लक्षण आढळलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यशाळेत आरोग्य विभागाचे उपसंचालक नितीन
बिलोलीकर यांनी स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे व उपचार कसे करावे याची माहिती दिली. या कार्यशाळेला वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: