Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुढच्यावेळीही मीच मुख्यमंत्री असेन
ऐक्य समूह
Monday, October 08, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn2
5लातूर, दि. 7 (वृत्तसंस्था) : विकासकामांसाठी लातूरकरांनी निधीची चिंता करू नये, कारण पुढच्या वेळीही मीच मुख्यमंत्री असेन. राज्य शासनाने बेघरांना घरे देण्याची योजना अंमलात आणणे सुरू केले असून राज्यातील 12 लाख बेघरांपैकी 10 लाख बेघरांना 2019 पर्यंत घरे पुरवली जाणार आहेत. आरोग्यसेवेत अत्याधुनिकता आली असली तरी आजची आरोग्यसेवा सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाही. 
आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजनांमुळे गरीब माणूसही महागडी वैद्यकीय सेवा घेऊ शकतो. त्यामुळे आता ग्रामीण भागातही खासगी वैद्यकीय सेवेत वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लातूर येथे एका जाहीर कार्यक्रमात केले.
व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रावर व विशेषत: मराठवाड्यावर दुष्काळाचे मोठे सावट आहे. 31 डिसेंबरनंतर केंद्राची टीम दुष्काळाच्या पाहणीसाठी येईल. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई व विविध उपाययोजानांसाठी सरकारचे सहकार्य राहील. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. आघाडी सरकारच्या काळात जेवढी मदत शेतकर्‍याला करण्यात आली त्याच्या तिप्पट मदत आपल्या सरकारच्या कारकिर्दीत करण्यात आली आहे.
पुन्हा उजनीच्या पाण्याची मागणी
लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण सोडवण्यासाठी उजनीचे पाणी लातूरला मिळावे ही 15 वर्षांपासूनची जुनी मागणी यानिमित्ताने पुढे रेटण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी केली. पालकमंत्री संभाजी पाटील यांनी गेल्या दोन वर्षात जलयुक्तद्वारे उजनीहून जितके पाणी येईल तितके पाणी याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून निर्माण झाले असल्याचे सांगितले.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उजनीचे धरणही माझ्याच खात्याकडे असल्याचा उल्लेख करून मूळ विषय सोडून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या पाणी टंचाईचा उल्लेख केला, मात्र उजनीच्या पाण्यावर बोलणे शिताफीने टाळले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: