Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
युवतीची छेड काढून तिच्या भावाला मारहाण
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: re3
भणंग येथील पाच तरुणांना अटक
5कुडाळ, दि. 8 : एका महाविद्यालयीन तरुणीची रस्त्याने जाता-येता छेड काढणार्‍या आणि याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या भावाला मारहाण करणार्‍या भणंग, ता. जावली येथील पाच तरुणांना मेढा पोलिसांनी अटक केली आहे.
भणंग येथील समीर सुरेश जाधव, ऋषिकेश एकनाथ जाधव व अमर शत्रुघ्न गाडेकर हे तिघे पीडित युवतीला चिठ्ठ्या देऊन छेडछाड करत होते. ही बाब पीडितेने तिच्या भावाला सांगितली. त्यामुळे तिच्या भावाने रविवारी (दि. 7) या तरुणांना जाब विचारला असता संशयितांनी त्याला मेढा येथील वेण्णा चौकात मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा या तिघांसह त्यांच्या सात-आठ साथीदारांनी पीडित युवतीच्या भावास घरातून बाहेर ओढून मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी पीडितेचे वडील व आजी गेली असता त्यांनाही संशयितांनी ढकलून दिले. पीडित युवतीही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना समीर जाधवने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. संशयितांनी पीडितेच्या घरातील लोकांना शिवीगाळ केली आणि सातारा येथून आणखी मुले घेऊन येऊन मारहाण करण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून त्यावरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी भणंग येथील समीर सुरेश जाधव, ऋषिकेश एकनाथ जाधव, अमर शत्रुघ्न गाडेकर, किरण दशरथ जाधव व उमेश मोहन सुतार यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्यात अन्य तीन जणांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सपोनि जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल गायकवाड तपास करत आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: