Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा. उदयनराजेंना रामदास आठवलेंची ‘ऑफर’
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 8 (वृत्तसंस्था) : सातार्‍याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यास त्यांच्या पक्षातूनच विरोध होत असताना रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खा. उदयनराजे यांना आपल्या पक्षाकडून सातार्‍यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची ‘ऑफर’ दिली आहे. राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यास उदयनराजेंनी रिपाइंच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे आठवले म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, यावर सध्या जोरदार खल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत काल सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी खा. उदयनराजे यांच्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्या, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याच वेळी खा. उदयनराजे यांनीही आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाला सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर रामदास आठवले यांनी खा. उदयनराजेंना रिपाइंकडून तिकिटाची ऑफर दिली आहे. आठवले यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकसभेच्या गत निवडणुकीतही खा. उदयनराजे  यांना उमेदवारी देण्यापूर्वी राष्ट्रवादीने बराच घोळ घातला होता. त्यावेळीही रामदास आठवले यांनी उदयनराजेंना रिपाइंच्या उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, बर्‍याच नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवून उदयनराजे दुसर्‍यांदा खासदार झाले होते. आता आठवले यांच्याबरोबर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही उदयनराजेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. उदयनराजे हे ताकदवान नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. त्यांचेही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत आहे, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: