Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मटका बहाद्दर समीर कच्छी पुन्हा जेरबंद
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 8 : तडीपारीच्या आदेशाचे दुसर्‍यांदा उल्लंघन केल्या प्रकरणी सातार्‍यातील मटका बहाद्दर समीर कच्छी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. दरम्यान, समीर कच्छी हा दहा दिवसांत दुसर्‍यांदा शहरात खुले आम फिरताना आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
मटका बहाद्दर समीर सलीम कच्छी (वय 38, रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर सातारा शहर, सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मारहाणीचेही काही गुन्हे दाखल असल्याने त्याला तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो सातार्‍यात खुले आम फिरत होता. रविवारी रात्री तो सातार्‍यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावर पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी फिरत होते. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिफाफीने पकडले.
समीर कच्छी हा यापूर्वीही तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून सातार्‍यात आला होता. दि. 29 सप्टेंबर रोजी तो सैदापूर, ता. सातारा येथील घरात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला होता. या छाप्यात कच्छीला अटक करुन पोलिसांनी त्याच्या घरातून महागड्या मद्याच्या बाटल्या, संगणक, एलसीडी मॉनिटर, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम, असा सुमारे एक लाख रुपयाचा  मुद्देमाला जप्त केला होता. त्यानंतर दहा दिवसांनी तो पुन्हा
पोलिसांना सापडला. त्याने दोन वेळा तडीपारीच्या आदेशाचे
उल्लंघन केल्याने पोलीस त्याच्यावर आणखी कठोर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत.
स्थागुशाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, हवालदार बंडा पानसांडे, शरद बेबले,
प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, मोहसीन मोमीन, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: