Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आयएसआय’च्या एजंटाला नागपूरमध्ये अटक
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: mn1
‘ब्राह्मोस’ची माहिती पाकला पुरवली; ‘एटीएस’ची कारवाई
5नागपूर, दि. 8 (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) नागपूर युनिटमध्ये काम करणारा अभियंता निशांत अग्रवाल याला हेरगिरीच्या संशयावरून उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने सोमवारी अटक केली. त्याला ब्राह्मोस एअरोस्पेस केंद्राजवळून त्याला पकडण्यात आले. त्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे. निशांत हा उत्तराखंडमधील रुरकीचा रहिवासी असून तो ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता आणि बनावट फेसबुक अकौंट काढून ‘आयएसआय’ला माहिती पुरवत होता, असे उघड झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत अग्रवाल हा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) गेली काही वर्षे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करत असून सध्या त्याची नेमणूक ‘डीआरडीओ’च्या नागपूर युनिटमध्ये होती. या युनिटकडेच ब्राह्मोस एअरोस्पेस केेंद्राची जबाबदारी आहे. या केंद्राच्या जवळूनच उत्तर प्रदेश व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि लष्करी गुप्तचर विभागाने अग्रवालला अटक केली. या कारवाईत नागपूर पोलिसांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्याच्यावर ‘शासकीय गुपिते कायदा 1923’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत हा ब्राह्मोस क्षेपणास्त्राची संवेदशनील  तांत्रिक माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना पाठवत असल्याचा आरोप आहे. एटीएस आणि लष्करी गुप्तचर विभागाची पथके रविवारी रात्रीपासून त्याच्या पाळतीवर होती. सोमवारी या पथकाने त्याला अटक केली. निशांत हा मेकॅनिकल इंजिनिअर असून ‘डीआरडीओ’मध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे. यावर्षी मार्च महिन्यात निशांतचा विवाह झाला आहे.
ब्राह्मोस एरोस्पेस केंद्र नागपुरात असून निशांत ब्राह्मोस युनिटमध्येच गेल्या चार वर्षांपासून कार्यरत होता. त्यामुळे संशोधन विभागाची बरीच गुप्त माहिती त्याच्याकडे होती. हे केंद्र भारत आणि रशिया यांच्याकडून संयुक्तरित्या चालवले जाते. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या काही अत्याधुनिक प्रणालींची चाचणी अलीकडेच घेण्यात आली होती. नागपूरला नियुक्ती होण्यापूर्वी निशांत अग्रवाल हा ‘डीआरडीओ’च्या हैद्राबाद येथील केंद्रात कार्यरत होता. त्याला 2017-18 मधील उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून ‘डीआरडीओ’च्या अध्यक्ष आणि सचिवांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. त्याने हरियाणातील कुरुक्षेत्र ‘एनआयटी’मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. ‘डीआरडीओ’चे ब्राह्मोस युनिट डोंगरगाव येथे आहे. निशांत हा नागपूरमधील उज्ज्वलनगरातील रहिवासी मनोहर काळे यांच्या घरी भाड्याने रहात होता. या प्रकरणी केंद्र सरकार वा ब्राह्मोस एरोस्पेस केंंद्राच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी मौन बाळगले आहे.
ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तरित्या विकसित केले आहे. कमी अंतरापर्यंत हल्ला करणारे हे क्षेपणास्त्र लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या ताफ्यात तैनात करण्यात आले आहे. हवेतच मार्ग बदलण्याची आणि चालते लक्ष्य भेदण्याची ब्राह्मोसची क्षमता आहे. अवघ्या दहा मीटरच्या उंचीवरुन उडून शत्रूपक्षाच्या रडारलाही पकडता येणार नाही, हे ब्राह्मोसचे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वनातीत वेगाने उडते. त्याचा वेग अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या दुप्पट आहे.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: