Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
घोणस सापाची विक्री करणार्‍या तिघांना 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 9 : घोणस जातीचा साप जवळ बाळगून तो बेकायदेशीर विक्री करणार्‍या तिघांना मुख्य न्यायदंडाधिकारी डी.बी. माने यांनी 3 वर्षे सक्तमजुरीची आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न दिल्यास आणखी 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. या शिक्षेच्या निर्णयाचे वन्यजीव प्रेमींनी स्वागत केले आहे.
शिक्षा झालेल्या आरोपींची दिनेश गजानन पंडीत (वय 21),   वैभव विलास खवळे (वय 18), निशांत विजय किर्तीकुडाव (वय 19, सर्व रा. कोडोली, सातारा) अशी नावे आहेत.
या प्रकरणी सातारा नवविभागाचे वनक्षेत्रपाल कमलाकर रामचंद्र पोतदार (वय 52) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 18 डिसेंबर 2011 रोजी सातारा शहर परिसरात विषारी घोणस जातीच्या सापाची विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वनविभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केल्यानंतर संबंधित तिघांकडे त्यावेळी घोणस जातीचा विषारी साप आढळला. वनविभागाने याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला. वनक्षेत्रपाल कमलाकर पोतदार यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात बचाव व सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद झाला.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी मंगळवारी तिन्ही आरोपींना शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. याप्रकरणात एकूण पाच साक्षीदार
तपासण्यात आले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, अविनाश पवार, अजित शिंदे, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे, क्रांती निकम यांनी काम पाहिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: