Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पवनचक्कीवरून येणार्‍या 33 केव्ही विजेच्या तारांमुळे एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re3
5मेढा, दि. 9 : करंजे तर्फ मेढा येथील मरिआई मंदिरावरील झेंडा बदलताना पवनचक्कीवरून येणार्‍या 33 केव्ही विजेच्या धक्क्याने शेतकरी भगवान धनावडे यांचा जागीच मृत्यू झाला.
जावली तालुक्यातील करंजे येथील मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्‍वर धनावडे (वय- 59) यांना पवनचक्कीच्या विजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा.मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, की नवरात्रीनिमित्त करंजे येथील मरिआई मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्त देवळाची साफसफाई करण्यासाठी भगवान धनावडे व त्यांची पत्नी रंजना हे दोघे जण मंगळवारी सकाळी मंदिराजवळ साफसफाई करीत होते. मंदिराच्या भिंतीला लागून लोंखडी पाइपला झेंडा बांधण्यात आला होता.  
तो खूप जुना झाल्याने पाइप बाजूला घेण्यासाठी भगवान धनावडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण पाइप काढत होते. परंतु वीजप्रवाह करणारी लाइन मंदिराला घासून असल्याने पाइपचा तोल नकळत वीजप्रवाह करणार्‍या तारेने ओढून घेतला व भगवान धनावडे यांना जोरदार शॉक बसून ते मंदिराच्या व्हरांड्यात फेकले गेले. यामध्ये ते जागीच मृत्युमुखी पडले. तसेच अक्षय करंजेकर हा बाहेर फेकला गेला. अक्षय जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान करंजे ग्रामस्थांनी संबंधित पवनचक्की मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मयताच्या कुटुंबीयांना पवनचक्की मालकाकडून तातडीची मदत देण्यात यावी अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: