Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात दुष्काळाचे सावट गडद
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: mn3
पालकमंत्री जिल्ह्यांचे दौरे करणार
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : राज्यातील 201 तालुक्यांमध्ये यंदा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळाचे सावट पडले आहे. खरिपाची पिके व रब्बीचा पूर्ण हंगामच धोक्यात आला असून राज्यातील या परिस्थितीचा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मंत्री, पालकमंत्र्यांना सर्व जिल्ह्यांचे दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून पालकमंत्री अहवाल सादर करणार असून त्यानंतर आवश्यक निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मान्सूनचा सुरुवातीला झालेला अपुरा पाऊस आणि परतीच्या पावसाने केलेली निराशा यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील 200 हून अधिक तालुक्यातील स्थिती चिंताजनक आहे. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमधील स्थिती अडचणीची असून मराठवाड्यातील आठ हजार गावांमध्ये टंचाई स्थिती आहे. पिकांची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे. विदर्भातील पीक परिस्थिती मराठवाड्यापेक्षा काहीशी बरी असली तरी लहान-मोठ्या धरणांमध्ये केवळ 45 टक्के पाणीसाठा आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकार्‍यांकडून प्राथमिक माहिती घेण्यात आली असून मंत्री व संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करावेत, असा निर्णय आज घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे या संपूर्ण कार्यक्रमाच्या आखणीची जबाबदारी देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत मंत्री संपूर्ण अहवाल सादर करणार आहेत.
जिल्हाधिकारी स्तरावर यापूर्वीच पाहणी सुरू करण्यात आली आहे. 2016 च्या मॅन्युअलमध्ये केंद्राने याबाबत निकष तयार केले आहेत. त्यानुसार माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारच्या निकषांनुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: