Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तारळी प्रकल्पास 1610 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पाच्या एक हजार 610 कोटींच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे पाटण, कराड, सातारा, खटाव आणि माण या तालुक्यांमधील अवर्षणप्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
पाटण तालुक्यातील डांगिष्टेवाडी येथील या प्रकल्पांतर्गत खालील बाजूस तारळी नदीवर आठ उपसा सिंचन योजना करून तारळी खोर्‍यातील सहा हजार 507 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यास शाखा कालवे काढून त्याद्वारे जिल्ह्यातील खटाव व माण या तालुक्यांमधील आठ हजार 876 हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई’ योजनेत झाल्याने सुधारित खर्चासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या प्रस्तावानुसार एक हजार 610 कोटींमध्ये एक हजार 482 कोटी प्रत्यक्ष कामासाठी तर 128 कोटी अनुषंगिक कामांसाठी खर्च करण्यात येतील. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन, कोपर्डे पोहोच कालवा आणि माण व खटाव कालव्याचे काम पूर्ण होऊन अवर्षण प्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे शक्य होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: