Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणी पुढील महिन्यात आरोपपत्र
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:45 AM (IST)
Tags: mn2
सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती
5मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सीबीआयने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे.
डॉ. दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीआयच्यावतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी डॉ. दाभोळकर खून प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याबाबत माहिती दिली. या प्रकरणी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने स्वत:हून 18 नोव्हेंबर ही मुदत निश्‍चित केली आहे, असे अनिलसिंग यांनी सांगितले. कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणातील आरोपी अमोल काळे याचा सीबीआयने डॉ. दाभोळकर खून प्रकरणी गेल्या महिन्यात कर्नाटकातील न्यायालयाकडून ताबा मिळवला. त्या आधी ऑगस्टमध्ये सीबीआयने सचिन अंदुरे यालाही अटक केली होती. या दोघांचा डॉ. दाभोळकर व गौरी लंकेश या दोन्ही खुनांमध्ये सहभाग असल्याची माहिती सीबीआयने उच्च न्यायालयात नुकतीच दिली होती. दाभोळकर खून प्रकरणी आतापर्यंत सात जणांना सीबीआयने अटक केली आहे किंवा इतर तपास यंत्रणांकडून ताबा मिळवला आहे.
दरम्यान, कॉ. पानसरे खून प्रकरणाचा तपास करणार्‍या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या विशेष तपास पथकानेही  (एसआयटी) आज उच्च न्यायालयात बाजू मांडली. दाभोळकर खून प्रकरणातील काही आरोपींचा पानसरे यांच्या खुनातही सहभाग असल्याचा संशय आहे. या संशयितांची सीबीआय कोठडीची मुदत संपायची वाट पहात असून ती संपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे एसआयटीने सांगितले. त्याचबरोबर
दोन्ही तपास यंत्रणांनी आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवालही उच्च न्यायालयात बंद लिफाफ्यांमध्ये सादर केला. महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा स्फोटके प्रकरणी अटक केलेल्या काही संशयितांचा डॉ. दाभोळकर खून प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यावरून सचिन अंदुरे व अन्य काही संशयितांना सीबीआयने अटक केली आहे. त्यामुळे या तपासाचा कोणताही
तपशील माध्यमांसमोर उघड करू नये, अशी ताकीद उच्च न्यायालयाने एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: