Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर आ. शिवेंद्रसिंहराजेंचे सपत्नीक पाऊल
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: lo2
5 हजार 180 मीटर उंचीवर जाण्याचा विक्रम : शिवाजी महाराजांनाही अभिवादन
5सातारा, दि. 10 : जगातील सर्वात उंच असणार्‍या माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर जाण्याची कामगिरी आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी पूर्ण केली असून बेस कॅम्पवर असणार्‍या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन  केले. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर  गेलेले जगातील ते पहिलेच लोकप्रतिनिधी असून या कामगिरीमुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. तब्बल 5 हजार 180 मीटर उंचीवर सपत्नीक पोहचून त्यांनी नवा विक्रम स्थापित केला आहे.
गेल्यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला सुरुची राडा झाला होता. त्यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वास्तविक त्यावेळीच एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र  कार्यकर्त्यांना उघड्यावर सोडून एव्हरेस्टवर जायचे कसे, असा पेच त्यांच्यासमोर  होता. त्यामुळे त्यांनी गेल्यावर्षी ही मोहीम रद्द केली होती. यावर्षी मात्र ही मोहीम पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. सातार्‍यातून पंधरा दिवसापूर्वी आ. शिवेंंद्रसिंहराजे, श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि आमदारांचे बंधू श्रीमंत विक्रमसिंहराजे भोसले आणि त्यांचे इतर सहकारी सातार्‍यातून एव्हरेस्टच्या बेस कॅम्पसाठी रवाना झाले. त्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावरच त्यांनी एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठला आहे. बेस कॅम्पवर पोहचण्यासाठी ते काठमांडू वरून नेपाळमधील सर्वात उंचीवर असलेल्या लुकला विमानतळावर पोहचून त्यांनी हा अवघड ट्रेक पूर्ण केला. त्यांच्यासमवेत विक्रमराजे यांचे ऑस्ट्रेलियातील काही मित्रांचाही सहभाग होता. एव्हरेस्टचा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून तब्बल 5 हजार  364 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी जाण्यासाठीही बर्‍याच अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. समुद्रसपाटीपासून कॅम्पची उंची जास्त असल्याने त्या ठिकाणी डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ असे त्रास होतात. सायकलिंग आणि मॅरेथॉन स्पर्धांचा अनुभव गाठीशी असल्याने आ. शिवेंद्रराजे यांना कोणताही त्रास झाला नाही.  
एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला पोहचणारे जगातील पहिले लोकप्रतिनिधी असाही लौकिक त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सातार्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बेस कॅम्पला पोहचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देवून त्यांनी वातावरण शिवमय करून टाकले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: