Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आणखी एक ‘विराट’ विक्रम
ऐक्य समूह
Thursday, October 25, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: sp1
सर्वात वेगवान ‘दस हजारी’ मनसबदार
5विशाखापट्टणम, दि. 24 (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एका महाविक्रमाला गवसणी घातली आहे. दहा हजार धावांचा टप्पा सर्वात जलद ओलांडण्याचा विक्रम विराटने केला असून विंडीजविरुद्ध आज झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विराटने ही मजल गाठली.  विराटने सचिनपेक्षा 54 डाव कमी खेळून ‘दस हजारी’ मनसबदार होण्याचा पराक्रम केला आहे. सचिनने हा टप्पा 259 डावांमध्ये गाठला होता तर विराटने केवळ 205 डावांमध्ये हा विक्रम केला. या कामगिरीमुळे आणखी काही विक्रम विराटपुढे नतमस्तक झाले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांची मजल गाठण्यासाठी विराटला आजच्या सामन्यात 81 धावा हव्या होत्या. ही मजल त्याने सहज गाठताना कारकिर्दीतील 37 वे एकदिवसीय शतकही झळकवले. 213 एकदिवसीय सामन्यांमधील 205 डावांत 10 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावावर लागला. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 37 शतके आणि 49 अर्धशतके झळकवली आहेत. विराटने ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा 17 वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडला. सचिनने 31 मार्च 2001 रोजी 259 डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणार्‍या फलंदाजांमध्ये भारताचाच माजी कर्णधार सौरव गांगुली तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि महेंद्रसिंग धोनी, ब्रायन लारा, राहुल द्रविड, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, इंझमाम-उल-हक, सनथ जयसूर्या व महेला जयवर्धने यांचा क्रमांक लागतो.
सरासरी, शतके,
स्ट्राईक रेटमध्येही ‘विराट’
दहा हजार धावांचा टप्पा गाठताना सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही विराटने आपल्या नावावर केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आजझळकवलेले शतक एकदिवसीय कारकिर्दीतील 37 वे आहे. दहा हजार धावांचा टप्पा गाठताना सचिनने 28 शतके झळकवली होती. विराटची सरासरीही 59.62 अशी जबरदस्त आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी (51.30) दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर जॅक कॅलिस (45.45), रिकी पाँटिंग (42.91) व सचिन तेंडुलकर (42.64) यांचा क्रमांक लागतो.   
दहा हजार धावा पूर्ण केल्यावर विराटचा स्ट्राईक रेटही सर्वोत्तम आहे. त्याने 92.95 असा जबरदस्त स्ट्राईक रेट राखला आहे. हा विक्रम आधी सनथ जयसूर्याच्या (88.52) नावावर होता. त्याचबरोबर विराटने 9000 ते 10000 हजार हा पल्ला केवळ 11 सामन्यांमध्ये गाठला. त्यात त्याची पाच शतके व तीन अर्धशतके आहे. या 11 सामन्यांमध्ये त्याने 103.87 हा स्ट्राईक रेट आणि 149.2 अशी सरासरी राखली.
विराटने आतापर्यंत सहा देशांविरुद्ध एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड यांच्याविरुद्ध हा पराक्रम केला आहे. त्याशिवाय घरच्या मैदानावर सर्वात जलद 4 हजार धावा पूर्ण करण्याचा एबी डीव्हिलियर्सचा विक्रमही विराट मोडला आहे. डीव्हिलियर्सने 91 डावांमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने 78 डावांमध्येच ही कामगिरी केली. दहा हजार धावांचा टप्पा ओलांडायला विराटने 10 वर्षे व 68 दिवस घेतले. भारतीय खेळाडूंमध्ये ही सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. या आधी राहुल द्रविडने 10 वर्षे 317 दिवसांमध्ये 10 हजार धावा केल्या होत्या. सर्वात कमी चेंडूंचा सामना करत दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही विराटने केला आहे. त्याने ही कामगिरी करण्यासाठी 10 हजार 813 चेंडू घेतले. दोन प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध सलग तीन शतके झळकवणारा विराट हा एकमेव फलंदाज आहे. त्याने श्रीलंका व विंडीजविरुद्ध ही कामगिरी केली आहे. कर्णधार या नात्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रमही विराटने 137 डावांमध्ये केला आहे. त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षात सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर. विराटने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन दीडशतके झळकवणारा विराट हा दुसरा कर्णधार आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉसने अशी कामगिरी केली आहे.
भारताचा पाचवा ‘दस हजारी’ मनसबदार
एकाच वर्षात कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा करणारा विराट हा पाचवा कर्णधार ठरला आहे. या आधी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, अँजलो मॅथ्यूज, स्टीव्ह स्मिथ यांनी अशी कामगिरी केली आहे. एका कॅलेंडर वर्षात एक हजार धावा करण्याची विराट कोहलीची ही सहावी वेळ आहे. याबाबत सचिन विराटच्या पुढे आहे. संघ दुसर्‍यांदा फलंदाजी करत असताना विराटने सहा हजार धावा केल्या असून त्याच्या दहा हजार धावांमधील सात हजार धावा या संघाच्या विजयात हातभार लावणार्‍या ठरल्या आहेत. संघ विजयी होत असताना विराटची सरासरी 78 पेक्षा अधिक आहे तर संघ पराभूत होत असताना विराटची सरासरी 36 पेक्षाही कमी असते. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट हा भारताचा पाचवा ‘दस हजारी’ मनसबदार ठरला आहे. या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड व महेंद्रसिंग धोनी यांनी ही किमया केली होती. आता ‘दस हजारी’ मनसबदारांच्या संख्येत भारताने श्रीलंकेला मागे टाकले होते. विराटने ही किमया करण्याच्या आधी भारत आणि श्रीलंकेचे प्रत्येकी चार ‘दस हजारी’ मनसबदार होते. आता भारताने पाचवा मनसबदार एकदिवसीय क्रिकेटला दिला आहे. त्यामुळे भारताने लंकेला मागे टाकले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: