Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘राफेल’ प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा
ऐक्य समूह
Thursday, November 01, 2018 AT 11:44 AM (IST)
Tags: na1
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी करारातील किमतीविषयीचा तपशील बंद लिफाफ्यातून सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला दिला. मात्र, ‘व्यूहात्मक आणि गोपनीय’ माहिती उघड करण्याची आवश्यकता नाही, या केंद्र सरकारच्या म्हणण्याला न्यायालयाने मान्यता दिली.
भारतीय हवाई दलासाठी फ्रान्सच्या दासाँ कंपनीकडून राफेल विमान खरेदी करण्याच्या करारात भ्रष्टाचार झाला असून या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्याची, मागणी करणार्‍या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर आज सुनावणी झाली. येत्या 10 दिवसांत राफेल करारासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करा आणि या व्यवहारातील किमतीचा तपशील सादर करा, असा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. यू. यू. ललित व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला आज दिला. राफेलची किंमत, खरेदीच्या निर्णयाची प्रक्रिया आणि ऑफसेट पार्टनर निवडण्याची प्रक्रिया, अशी संपूर्ण माहिती सीलबंद पाकिटात येत्या 10 दिवसात सादर करा, असे निर्देश खंडपीठाने दिले.  
मात्र, सरकारी गुप्ततेच्या कायद्यान्वये अशा करारांमधील किमतीची माहिती व अन्य तपशील सार्वजनिक करता येणार नाही, असे म्हणणे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी मांडले. त्यावर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर करून नेमकी काय अडचण आहे, हे नमूद करावे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे खंडपीठाने नमूद केले. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, यशवंत सिन्हा आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर 14 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: