Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘ईडी’ला हवी पी. चिदंबरम यांची कोठडी
ऐक्य समूह
Thursday, November 01, 2018 AT 11:47 AM (IST)
Tags: na2
एअरसेल-मॅक्सिस प्रकरण
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : एअरसेल-मॅक्सिस करारात झालेल्या पैशांच्या अफरातफरी (मनी लाँड्रिंग) प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज विशेष न्यायालयात विरोध केला. या प्रकरणाच्या तपासात चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीची मागणी ‘ईडी’ने केली.
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी पी. चिदंबरम यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ‘ईडी’ने आपले म्हणणे नोंदवले. ‘ईडी’ने चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास स्पष्ट शब्दांत विरोध केला. चिदंबरम हे चौकशीत सहकार्य करत  नसल्याने त्यांना कोठडीत घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना कोठडी द्यावी, अशी मागणी ‘ईडी’ने केली. यावर विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या न्यायालयात उद्या (गुरुवार) सुनावणी होणार आहे.
चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांना 1 नोव्हेंबरपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश न्यायालयाने 8 ऑक्टोबरला दिला होता. पी. चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी 30 मे रोजी न्यायालयात धाव घेतली होती. ‘ईडी’ने 25 ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून त्यांच्यावर विदेशी गुंतवणूकदारांसोबत संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: