Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘अवनी’ वाघिणीची हत्या केल्याचा मनेका गांधी यांचा आरोप
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:52 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : गेल्या दोन वर्षांत 13 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवड्यातील ‘टी-1’ या पाच वर्षांच्या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मात्र, या वाघिणीच्या मृत्यूवरुन आरोपांची मालिका सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रचंड संताप व्यक्त करत वाघिणीची ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीचे मृत्यू प्रकरण आपण गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटले आहे. वाघिणीवर गोळी झाडणार्‍या नवाब शराफतअली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. वाघिणीची हत्या हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले. असे करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी तीन वाघ, शेकडो बिबटे आणि वन्य जीवांची हत्या केली आहे. प्रत्येकवेळी ते हैदराबाद येथील नेमबाज नवाब शराफतअली  खानचा वापर करतात. यावेळी खानने त्याच्या मुलालाही बरोबर घेतले होते. त्याच्या मुलाला हा अधिकार नाही. हे बेकायदा कृत्यच आहे. त्या वाघिणीला पकडण्याऐवजी एखाद्या नेमबाजाच्या हातून या वाघिणीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्याच असल्याचा उल्लेख मनेका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये सातत्याने केला आहे.
          
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: