Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद ठेवा : स्वाभिमानी
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:53 AM (IST)
Tags: re4
5सांगली, दि. 4 (प्रतिनिधी) : शासनाकडून ऊस दराचे धोरण जाहीर होईपर्यंत साखर कारखाने बंद ठेवावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दुसर्‍या दिवशीही उर्वरीत कारखान्यांवर रॅलीद्वारे धडक मारली. कारखाने बंद ठेवण्याबाबत कारखान्यांना यावेळी इशारा देण्यात आला. रॅलीमुळे संबंधित कारखान्यांवर चोख पोलीस बंदोबस्त होता.
ऊसदरावर शासनाने तोडगा काढावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी राजारामबापू, हुतात्मा, क्रांती, सोनहिरा साखर कारखान्यांवर धडक दिली होती. त्यावेळी काही कारखाना कार्यस्थळांवर वादावादीचे प्रसंग घडले होते. त्यामुळे आज रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर उर्वरीत पाच कारखान्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उपाध्यक्ष महावीर पाटील, विकास देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, जयकुमार कोले, सावकार मादनाईक, संजय बेले, संदीप राजोबा, भरत चौगुले आणि कार्यकर्ते आज  बायपास रस्त्यावर सकाळी जमले होते.
पोलीस बंदोबस्तात संघटनेचे कार्यकर्ते दत्त इंडियावर गेले. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते. कारखाना कार्यस्थळावर बॅरिकेटस लावून मार्ग अडवून धरला होता. बॅरिकेटजवळ कार्यकर्ते आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे तेथे आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कारखाना बंद ठेवण्याबाबत शिंदे यांना सूचना केली. तेव्हा शिंदे यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली. दत्त इंडियानंतर कार्यकर्त्यांनी मिरजेकडे मोर्चा वळवला. दुचाकीवरील शेकडो कार्यकर्ते आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यांकडे रवाना झाले. रॅलीच्या मार्गावरही पोलीस सोबत होते. कारखाना कार्यस्थळावर जाऊन शासन तोडगा काढेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर कवठेमहांकाळ येथील महाकाली कारखाना, कार्वे-बामणी येथील उदगिरी शुगर्स आणि नागेवाडीतील यशवंत कारखाना येथे जाऊनही कारखाना बंद ठेवण्याची मागणी केली. आज पाच साखर कारखान्यांवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली.
ऊसतोडी बंद ठेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद आहेत. शेतकर्‍यांनी देखील ऊसतोडणी बंद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी देखील कारखाने बंद ठेवावेत. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: