Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारत-चीन सीमेपर्यंत रस्ते बांधणीचे काम सुरू
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn3
5उत्तराखंड, दि. 5 (वृत्तसंस्था) : भारत-चीन सीमेपर्यंत रस्ते बांधणीच्या कामास सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
याबाबत बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांचे हे जाळे महत्त्वाचे आहे. सीमेलगतच्या ग्रामीण भागातील लोक हे आपल्या लष्करासाठी माहितीचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत.
बीआरओचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह म्हणाले, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला योजनेंतर्गत 18 हजार कोटी रुपये खर्चून चीन सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे उभारण्यास सुरुवात झाली आहे. या नियोजित योजनेत बैजनाथ-थराली-कर्णप्रयाग मार्ग, अस्कोट-धारचूला-मालपा मार्ग, कपकोट-मनस्यारी मार्ग, सेराघाट-जौलजीवी मार्ग, माना-मूसा पानी-माणा पास मार्ग आणि जोशीमठ-मलारी मार्ग या मार्गांवर रस्ते बांधणीचे काम होणार आहे. यासाठी भूमी अधिग्रहण आणि वनखात्याकडून परवानगी मिळाल्याबद्दल सिंह यांनी या खात्याचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या रस्ते उभारणीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री रावत यांनी बीआरओच्या हरिद्वार रोड प्रकल्प मुख्यालयासाठी 20 एकर जमीन उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. राज्यातील सीमा भागात आणि गावांमध्ये रस्त्यांची बांधणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: