Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आयएनएस अरिहंत शत्रूसाठी खुले आव्हान
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 10:49 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : देशाची पहिली अण्वस्त्रवाहक पाणबुडी आयएनएस अरिहंतने सोमवारी आपली पहिली गस्ती मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानिमित्त या पाणबुडीवरील कर्मचार्‍यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अरिहंतचा अर्थ शत्रूला नष्ट करणे असा आहे. आयएनएस अरिहंत ही सव्वाशे कोटी भारतीयांच्या सुरक्षेची हमी देणारी पाणबुडी आहे. भारताच्या शत्रूला आणि शांततेच्या विरोधात कारवाया करणार्‍यांना ही पाणबुडी खुले आव्हान आहे.
आयएनएस अरिहंत पाणी, जमीन आणि आकाशातून हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताकडे जमिनीवरून लांब पल्ल्यावरील लक्ष्यभेद करणारी अग्नी क्षेपणास्त्रे पहिल्यापासून आहेत. त्याचबरोबर अणू हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम लढाऊ विमानेदेखील आहेत. आता आयएनएस अरिहंतमध्ये पाण्याखालील अण्वस्त्र हल्ल्याचा शोध घेऊन त्याला उत्तर देण्याची क्षमता आहे.
यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले, की आपल्या शेजारील  राष्ट्रांमध्ये अण्वस्त्रांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना देशात विश्‍वसनीय अण्वस्त्र क्षमता निर्माण करणे खूपच गरजेचे आहे. अरिहंतमुळे आपण आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होऊन शत्रूला सडेतोड उत्तर देऊ शकू.
ते म्हणाले, आयएनएस अरिहंत भविष्यातील भारतासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. भारत कोणाचीही खोड काढत नाही. मात्र, भारताची छेड जर कोणी काढली तर त्याला भारत सोडत नाही. आपली अण्वस्त्रक्षमता ही आक्रमणाचा भाग नाही, मात्र सुरक्षेचे उपकरण आहे. शांती, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी आपली अण्वस्त्र  क्षमता खूपच महत्त्वाची आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: