Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: mn2
उद्धव ठाकरे यांची घोषणा
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी करणार आहेत.
सरकार जबाबदारी घेत नसेल तर शिवसेना अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, अशा उपरोधिक टीकेला शिवसेनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यापूर्वी स्मारकाच्या कामाची घोषणा करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक राज्य सरकार उभारणार असून त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. महापौर निवास हे हेरिटेज वास्तू असून ते समुद्र किनार्‍याजवळ आहे. त्यामुळे स्मारकासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या रखडल्या होत्या.  
या स्मारकासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या मिळाल्याने स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका अधिकार्‍याने दिली.
महापौर निवास हेरिटेज वास्तू असल्याने त्याची कोणतीही तोडफोड न करता या वास्तूमध्ये शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडून दाखवणार आहे. त्यासाठी खास थ्रीडी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असल्याचे समजते. त्यासाठी महापौर निवासात वेगवेगळे दालन केले जाणार आहे. तसेच महापौर निवासाच्या प्रांगणात शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेला बगीचा उभारला जाणार आहे. त्यांना आवडणारी फुलझाडे, औषधी झाडेही लावणार आहे. त्याचबरोबर हे स्मारक कशाप्रकारे बांधले जाणार आहे, याची इत्यंभूत माहिती उद्धव ठाकरे शनिवारी महापौर निवासात पत्रकार परिषदेत देणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: